पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ

murlidhar mohal elected New mayor of pune
murlidhar mohal elected New mayor of pune

पुणे- शहराच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ, तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली. मोहोळ आणि शेंगडे यांना प्रत्येकी ९७ मते मिळाली.  निवड होताच मोहोळ हे महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाले. तेव्हा मावळत्या महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मोहोळ यांचे अभिनंदन केले. दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार जिंकल्याने सभागृहात पक्षाच्या सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या आघाडीमुळे भविष्यात नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याचा अंदाज आहे. 

महापालिका परिसरातकार्यकर्त्यांचा आनंदोत्सव
महापौरपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच स्वपक्ष आणि विरोधी बाकांवरील सदस्यांच्या शुभेच्छा स्वीकारत मुरलीधर मोहोळ महापौरपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. या वेळी महापालिकेच्या इमारतीच्या परिसरात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून विजयोत्सव साजरा केला. दरम्यान, मोहोळ यांच्या कुटुंबीयांनी सभागृहात त्यांचे औक्षण केले. महापौरपदी मोहोळ यांच्या नावाची घोषणा केवळ औपचारिक असल्याने सकाळपासून महापालिकेत मोहोळ समर्थकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सभागृहाबाहेर आणि प्रेक्षागृहात कार्यकर्ते जमा झाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास निकाल जाहीर होण्याआधी भाजपच्या सदस्यांनी मोहोळ यांना पेढे भरवून अभिनंदन केले. त्यानंतर महापालिकेच्या आवारात पक्षाचे झेंडे घेऊन जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मोहोळ यांचे वडील किसन मोहोळ, आई वेणूबाई, पत्नी मोनिका यांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, कोथरूड परिसरात मोहोळ यांचे निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर विजय साजरा झाला. शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांनीही जल्लोष साजरा केला.

कोथरूडला प्रथमच महापौरपद
मोहोळ यांच्या निमित्ताने कोथरूडला प्रथमच महापौरपद मिळाले असून, ते आत्तापर्यंत तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पहिल्यांदा २००६, त्यानंतर २००७ आणि २०१७च्या निवडणुकीत ते कोथरूडमधून विजयी झाले. २०१२च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी मोनिका या नगरसेविका झाल्या होत्या. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर लगेचच महापौरपद मिळाल्याने महत्त्वाची पदे मिळालेले ते एकमेव भाजप नेते ठरले आहेत.

शेंडगे यांना आनंदाश्रू
नवी जातीय समीकरणे जुळविण्याच्या उद्देशाने भाजपने शेंडगे यांना पदाची संधी दिली. या पदावर निवड होताच शेंडगे यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

पाच आमदारांचे मतदान
महापालिकेचे सदस्य असलेल्या मात्र विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच नव्या आमदारांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मतदान केले. त्यात मावळत्या महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे, सुनील टिंगरे यांचा समावेश आहे.

शिवसेनेसोबत लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे महापौरपदासाठीचे उमेदवार प्रकाश कदम आणि उपमहापौरपदासाठी चांदबी नदाफ यांना ५९ मते मिळाली. महापौर आणि उपमहापौरपदांची निवडणूक प्रक्रिया महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी ‘व्हीप’ काढला होता. मतदानासाठी सभागृहात १५८ सदस्य या वेळी उपस्थित होते. 

निवडणूक प्रक्रिया सुरू होताच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी १५ मिनिटांची मुदत दिली. त्यात कोणीही माघार न घेतल्याने दोन्ही पदांसाठी मतदान घेण्यात आले. पहिल्यांदा महापौरपदासाठी झालेल्या मतदानात मोहोळ यांना भाजपच्या ९७ सदस्यांची मते मिळाली. त्यानंतर उपमहापौरपदासाठी शेंडगे यांनाही तितकीच मते मिळाली. त्यानंतर मोहोळ आणि शेंगडे विजयी झाल्याची घोषणा दिवेगावकर यांनी केली.

नव्या पुण्याची गरज, त्यातील पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने विकासाचे नवे मॉडेल आखून त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे शहर नव्या रूपात ओळखले जाईल. पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्यावर आगामी काळात भर दिला जाईल.   
- मुरलीधर मोहोळ, नवनिर्वाचित महापौर

शहराच्या विकासासाठी पक्षाने सोपविलेली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडेन. सर्व घटकांच्या लोकांसाठी कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. पक्षश्रेष्ठींचा विश्‍वास सार्थ ठरवेन.
- सरस्वती शेंडगे, नवनिर्वाचित उपमहापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com