वारकऱ्यांचे श्रद्धास्थान भामचंद्र डोंगराची लचकेतोड!

ABT
ABT

डोंगर पोखरून मुरूम उपसा;

बड्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाची चर्चा

आंबेठाण (पुणे) : चाकण एमआयडीसीतील मोकळ्या जागा पोखरल्यानंतर मुरूम माफियांनी आपला मोर्चा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भामचंद्र डोंगराकडे वळविला आहे. यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त होत असून, महसूल प्रशासन झोपले की काय, असा सवाल विचारला जात आहे. एका बड्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादातून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.

चाकण एमआयडीसीत कंपन्या उभारण्याची कामे सुरू असल्याने त्यासाठी मुरूम मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. रात्रीच्या वेळी चोरून मुरूम उकरायचा आणि तो कारखानदारांना किंवा अन्य ठिकाणी विकून लाखो रुपये कमवायचे, असा हा धंदा सुरू आहे. यासाठी तालुक्‍यातील महसूलच्या एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला हाताशी धरून हे मुरूम माफिया आपले उखळ पांढरे करत आहेत. एमआयडीसीत अनेक नव्या कंपन्या आणि शेडची कामे सुरू असून, त्याच्या भरावासाठी मुरूम वापरला जात आहे. एमआयडीसी भागात बहुतांश ठिकाणी विनापरवाना मुरूम उपसा केला जात आहे. आजवर सरकारी गायरान, एमआयडीसीच्या जागा, तसेच परगावी राहत असलेले गुंतवणूकदार किंवा कधी कधी शेतकऱ्यांना पत्ता लागू न देता त्यांच्या जागेतील मुरूम हे माफिया चोरी करीत आहे.

हा व्यवसाय करणाऱ्या बहुतांश लोकांनी रॉयल्टी भरलेली नाही; परंतु केवळ बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे माफिया बिनधास्तपणे मुरूम चोरी करीत आहेत. संबंधित बड्या अधिकाऱ्याला आम्ही दरमहा हप्ता देत असल्याने आम्हाला त्यांनीच परवानगी दिल्याचे ते सांगत आहेत.


मावळ तालुक्‍यातील काही व्यावसायिक तर हद्दीचा तिढा निर्माण करून मुरूमचोरी करीत आहेत. शिंदे गावात तर वीजखांबाच्या चारही बाजूंनी मुरूम काढल्याने हे खांब कधीही कोसळू शकतात, अशी परिस्थिती आहे. मुरूम चोरांचा एवढा धुमाकूळ सुरू असताना अधिकारी कारवाई का करीत नाही, याचे उत्तर मात्र गुलदस्तात आहे.

नुकतेच भांबोली येथील वेताळबुवा देवाची मूर्तीच या माफियांनी चोरून नेली. कोरेगाव फाटा परिसरात आदिवासी समाजाच्या गाडीला दिलेली जोरदार धडक ही यांच्या बेपर्वाईची ताजी उदाहरणे आहेत. त्यामुळे बेफाम झालेल्या या मुरुमचोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com