शिवनेरीवरील शस्त्रास्त्र संग्राहलयाला गती द्या - खा. आढळराव पाटील

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 30 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : शिवनेरी किल्ले संवर्धन व विकास प्रकल्पाअंतर्गत किल्ल्यावर आकर्षण आणि माहिती केंद्रासाठी अंबरखाना इमारतीमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय, माहिती केंद्र आणि अॅम्फिथिएटर निर्मितीला गती द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे केली आहे. याबाबतचे पत्र केंद्रिय पुरातत्व विभागासह मुंबई विभागाच्या सर्वेक्षण अधिक्षकांना दिले आहे. 

जुन्नर (पुणे) : शिवनेरी किल्ले संवर्धन व विकास प्रकल्पाअंतर्गत किल्ल्यावर आकर्षण आणि माहिती केंद्रासाठी अंबरखाना इमारतीमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय, माहिती केंद्र आणि अॅम्फिथिएटर निर्मितीला गती द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे केली आहे. याबाबतचे पत्र केंद्रिय पुरातत्व विभागासह मुंबई विभागाच्या सर्वेक्षण अधिक्षकांना दिले आहे. 

किल्ल्याचे संवर्धन आणि विकास हाेत असताना दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र किल्ल्यावर शिवाई देवी मंदिर, शिवजन्मस्थळ आणि शिवकुंज इमारती शिवाय इतर आकर्षण केंद्र नसल्याने पर्यटक जास्त वेळ किल्ल्यावर थांबु शकत नाही. तसेच किल्ल्यावर परिसराची माहिती देणारे केंद्र किल्ल्यावर नसल्याने शिवप्रेमी पर्यटकांची नाराजी व्यक्त हाेत आहे. किल्ल्यावर आकर्षण केंद्र म्हणुन अंबरखाना इमारतीचे संवर्धन आणि संरक्षित करुन त्याठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय, शिवनेरी संवर्धन प्रकल्पाचा माहितीपट दाखविण्यासाठी  अॅम्फिथिएटर आणि माहिती केंद्र स्थापन करावे अशी मागणी आम्ही २००७ पासून राज्य शासनाकडे करत आलाेय, अशी माहिती सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी दिली. 

खत्री म्हणाले,‘‘१९ फेब्रुवारी २००७ च्या शिवजयंती साेहळ्यात आम्ही ही मागणी केली हाेती. या कार्यक्रमात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी १ काेटी रुपयांची घाेषणा केली हाेती. मात्र अद्याप हा निधी पुरातत्व विभागाकडे वर्ग झालेला नाही. तर पवार यांच्या घाेषणेनंतर पुरातत्व विभागाने अंबरखाना इमारतीची स्वच्छता, डागडुजी, संवर्धनाची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र संग्रहालाच्या दृष्टीने काेणतीच कार्यवाही सुरु झालेली नाही. यासाठीचा पाठपुरावा म्हणुन आम्ही मुख्यमंत्र्यांसह राज्यासह, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, केंद्रीय पुरातत्व विभाग, तसेच मुंबई आणि जुन्नर पुरातत्व विभागाला पत्र दिले आहे.‘‘ 

खासदार आढळराव म्हणाले,‘‘शिवनेरी किल्ल्यावरील अंबरखाना इमारती मध्ये संग्रहालय, amphitheater थिएटर आणि माहिती केंद्रांची संकल्पना चांगली आहे. यासाठी मी प्रयत्नशिल असून, तसे पत्र पुरातत्व विभागाला दिले आहे. या प्रकल्पासाठीचा निधी आणि परवानगीसाठी मुख्यमंत्र्यांसह राज्य आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्याची भेट घेणार आहे.‘‘ 

याबाबत बाेलताना केंद्रीय पुरातत्व विभागाच्या जुन्नर विभागाचे संरक्षक सहाय्यक बी.बी.जंगले म्हणाले,‘‘सह्याद्री गिरीभ्रण संस्थेचा अंबरखाना इमारतीमधील संग्रहालयाबाबतचे पत्र मिळाले. संस्था अनेक वर्षापासून याबाबत प्रयत्नशिल आहे. त्यादृष्टीने सकारात्मक विचार आम्ही करत असून, अंबरखाना इमारतीच्या संवर्धनाची करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या इमारतीचा वापर काेणत्या कारणासाठी करायचा याचा अंतिम निर्णय वरिष्ठ कार्यालयाद्वारे घेतला जाईल.‘‘ 

‘‘शिवनेरी किल्ल्यावरील शस्त्रास्त्र संग्रहालयाबाबतचे पत्र आम्हाला मिळाले आहे. यावर सकारात्मक विचार करुन, याबाबतचा अभिप्राय स्थानिक अधिकाऱ्यांकडुन मागविण्यात येईल. त्यानंतर शिवकालीन उपलब्ध शस्त्रास्त्र आणि वस्तूंची उपलब्धतेनंतर त्यावर निर्णय घेतला जाईल.‘‘ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे बिपीनचंद्र नेगी यांनी सांगितले. 

Web Title: museum of arms give development