स्वरधारांत श्रोते चिंब 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

आम्हाला गायक, गायिका म्हटले जात असले तरी आम्ही अजूनही शास्त्रीय संगीताचे विद्यार्थीच आहोत. कोण कसा गात आहे, जागा कशा भरून काढत आहे, संगत कशी करत आहे, असे अनेक बारकावे आम्ही आजही शिकत असतो. 
- कलापिनी कोमकली, गायिका 

पुणे - वारा घोंघावत होता. ढग दाटून आले होते. पाऊस कुठल्याही क्षणी बरसणार होता. निसर्गाचा हा आविष्कार लक्षात घेऊन श्रोत्यांनी वेळेआधीच सभागृहात गर्दी केली. तेवढ्यात सुरेल गायनाला सुरवात झाली. एकामागून एक "स्वरधारा' बरसत राहिल्या अन्‌ श्रोते त्यात चिंब भिजत गेले. 

मनहर संगीत सभा व विलास जावडेकर यांच्या वतीने आयोजित "स्वर-विलास' या सांगीतिक मैफलीत श्रोत्यांनी ही अनुभूती घेतली. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य हेमंत पेंडसे यांच्या गायनाने मैफलीची सुरवात झाली. त्यांच्या "सखी आ नंद' रचनेने आणि पिलू रागातील "बादल देख राही वो' या रचनेला उपस्थितांची दाद मिळाली. 

त्यानंतर कुमार गंधर्व यांच्या शिष्या कलापिनी कोमकली स्वरमंचावर आल्या. त्यांनी मुलतानी रागात "आवेगी याद...' या बंदिशीने गायनाला सुरवात केली. "दिल बेकरार' ही द्रुत बंदिश सादर केली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी सहेली तोडी आणि ध्यानी राग ऐकवला. त्यामुळे मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पुढे पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य शौनक अभिषेकी यांच्या गायनाने मैफलीची सांगता झाली. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Musical concert in pune