...आता शरीयत बचाव मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

आगामी पालिका निवडणुकीत जात व धर्माच्या आधारे यावेळी अधिक ध्रुवीकरण होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

पिंपरी : मराठा समाजाच्या राज्यभरातील लाखोंच्या विक्रमी (मूक) मोर्चानंतर आता विविध समाजही एकवटू लागला असून असे मोर्चे काढत आहेत.
अॅट्रोसिटी कायद्यातील बदलासह आरक्षणासाठी मराठा मोर्चे होते. तर, 'अॅट्रॉसिटी'त बदल न करता तो उलट तो आणखी कडक करण्यासाठी रविवारी (ता. 27) संविधान सन्मान (मूक) मोर्चा दलित समाजातर्फे काढला जात आहे. तर, त्यानंतर लगेच दोन दिवसांनी (ता. 30) शिया, सुन्नीसह सर्व मुस्लिम पंथीयांच्या वतीने 'शरीयत बचाओ, संविधान बचाओ' आंदोलन करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे व परिसरातील दीड ते दोन लाख मुस्लिम बांधव त्यात सहभागी होतील, असा दावा आयोजक 'कुल जमाअती तंजीम'ने केला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत जात व धर्माच्या आधारे यावेळी अधिक ध्रुवीकरण होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज राज्यभर एकवटला. ऍट्रोसिटीत बदल करावा आणि आरक्षण द्यावे, यासाठी त्यांनी राज्यभर मूक मोर्चे काढले. त्याला विरोधम्हणून ऍट्रॉसिटी बदलू नये यासाठी दलित समाज एक झाला. त्यांनी प्रतिमोर्चे काढण्यास सुरवात केली. त्याचाच एक भाग म्हणून संविधान सन्मान मोर्चा काढला जात आहे. तर, त्यापाठोपाठ आता मुस्लिम समाजही आपल्या मागण्यांसाठी एक झाला आहे. आपल्यावरील गुन्हेगारी व दहशतवादाचा शिक्का पुसून टाकण्याकरीता तसेच शरियतमधील केंद्राच्या संभाव्य बदलाविरोधात त्यांनीही शरीयत बचाव आंदोलन सुरू केले आहे. राज्यघटनेनेही शरियतचा हक्क मान्य केला असल्याने त्यातील फेरबदलाविरोधात मुस्लिम एकवटले आहेत. त्यातही शरियतमधील तलाकच्या पद्धतीत बदल करण्यास त्यांचा विरोध केला आहे. त्यामुळेच त्यांनी शरीयत बचाव आंदोलन छेडले आहे.

येत्या बुधवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत येथील एच.ए. मैदानात
हे आंदोलन तथा मुस्लिम समाजाचा महामेळावा (तहाफुजे शरीयत कॉन्फरन्स) होणार आहे. आंदोलनासाठी कधीही घराबाहेर न पडणारी मुस्लिम महिला त्यात सहभागी होणार आहे, हे विशेष. मुस्लिम समाजातील सर्व पंथीयांचे मौलानांचा त्यात सहभाग असणार आहे. राज्यकर्त्यांकडून व त्यातही आताच्या केंद्र व राज्य शासनासह पिंपरी-चिंचवड पालिकेकडूनही मुस्लिम समाजाला दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे वरील सर्वपंथीय संघटनेचे म्हणणे आहे. शिक्षणापासून नोकरीपर्यंत सर्वत्र डावलले जात असल्यामुळे नाइलाजाने समाजातील काही तरुण वाममार्गाला लागतात, असे संघटनेच्या मौलाना मकसूद रिझवी यांचे म्हणणे आहे. सर्व राजकीय पक्षातील मुस्लिम या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: muslims to organise shariyat bachao morcha