अडीच मीटर उंचीपर्यंतच्या सीमाभिंतीचे काम पूर्ण

जनता वसाहत - कालव्याची फुटलेली भिंत बांधण्याचे व मातीचा भराव घालण्याचे काम वेगात सुरू आहे.
जनता वसाहत - कालव्याची फुटलेली भिंत बांधण्याचे व मातीचा भराव घालण्याचे काम वेगात सुरू आहे.

पुणे/ खडकवासला - कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून रविवारपर्यंत भगदाड पडलेल्या ठिकाणी अडीच मीटर उंचीपर्यंतचे सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, लष्कर भागाला पाणी कमी पडत असल्याने सायंकाळी साडेपाचनंतर कालव्यातून सुमारे साठ क्‍युसेसने पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून लष्कर भागातील विस्कळित झालेला पाणीपुरवठा सोमवारी (ता.१) काही प्रमाणात सुरळीत होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. तसेच  दुरुस्तीचे काम उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

अशी सुरू आहे दुरुस्ती
कालवा फुटला त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाने भिंत बांधण्याचे काम सुरू केलेले आहे. कालव्याच्या भरावाच्या खाली खडकामध्ये एक मीटर खोल खोदाई करण्यात आली. त्याची रुंदी साडेचार फूट आहे. त्यावर एक फूट उंचीचे काँक्रिटीकरण (पीसीसी) केले आहे. त्यावर लोखंडी जाळी टाकण्यात आली असून ६० सेंटिमीटरचा रॉफ्ट तयार केला. त्याच्या पायात साडेचार मीटर रुंद असलेली भिंत बांधण्यास सुरवात केली आहे. अडीच मीटर उंचीपर्यंत भिंतीचे काम रविवारी दुपारी पूर्ण झाले आहे. त्याच्यावर अजून अडीच मीटर उंचीची भिंत बांधली जाणार आहे. ही भिंत सुमारे दोन फूट रुंदीची असणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कालव्याची साफसफाई
एकीकडे दुरुस्तीचे काम सुरू असताना दुसरीकडे कालव्याची साफसफाईदेखील सुरू करण्यात आली आहे. गणपती विसर्जन नुकतेच झालेले आहे. त्यामुळे, गौरीचे मुखवटे, गणपतीचे निर्माल्य, अनेक मूर्त्या व नेहमीचा कचरा यामध्ये आहे. कालव्यातून पाणी सोडण्याची क्षमता १४२८ क्‍युसेक आहे. लष्कर जलकेंद्राला कालव्यातून फक्त ६० क्‍युसेक म्हणजे १५० एमएलडी पाणी सोडले आहे. पाणी कमी सोडले जाणार असल्यामुळे मार्गात अडथळा असल्यास पाणी पुढे जाण्यात अडथळा होऊ नये, या उद्देशाने ही साफसफाई केली आहे.

पाणी सोडण्यास सुरवात 
लष्कर जलकेंद्रासाठी ४०० एमएलडी पाण्याची आवश्‍यकता असते. बंद जलवाहिनीतून २५० एमएलडी पाणी घेतले जाते. तर उर्वरित १५० एमएलडी पाणी कालव्यातून घेतले जाते. सध्या हा कालवा फुटल्यामुळे त्यांना पाणी कमी पडत आहे. अडीच मीटर उंचीच्या भिंतीचे काम पूर्ण झाल्यामुळे या कालव्यातून १५० एमएलडी पाणी लष्कर जलकेंद्रासाठी उचलता यावे, यासाठी ६० क्‍युसेक पाणी कालव्यात सोडण्यास सायंकाळी साडेपाच वाजता सुरवात केल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com