'मुठाई महोत्सवा'मुळे जाईल नद्यांकडे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

गरवारे शाळा व 'एमएनव्हीटी'चे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कमिन्स इंडियाच्या 'सीएसआर' विभागातील कर्मचारी, आदर पुनावाला फाउंडेशन आणि महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी या अभियानात आपला सहभाग नोंदविला.

पुणे : 'आपल्या धर्म, संस्कृती व परंपरेमध्ये भारतीयांनी नद्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. मात्र सरकारच्या विविध योजना व स्वयंसेवी संस्थांकडून नद्यांसाठी केल्या जाणाऱ्या कामामुळे देशातील नागरिकांनी नद्यांकडे दुर्लक्ष केले. हे चित्र बदलून नागरिकांना पुन्हा एकदा आपल्या नद्यांकडे आणण्यासाठी 'मुठाई महोत्सवा'सारखे उपक्रम महत्त्वाचे काम करतील,'' असे मत इंडिया रिव्हर नेटवर्कचे अध्यक्ष कलानंद मणी यांनी शनिवारी व्यक्त केले. 

जनवाणी व मुठाई जीवित नदी या संस्थांतर्फे 'मुठाई रिव्हर फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत डेक्कन नदीपात्रामध्ये 'नदी स्वच्छता अभियान' राबविण्यात आले. या वेळी पाटबंधारे विभागाचे सल्लागार राजेंद्र माहूरकर, वास्तुविशारद सारंग यादवाडकर, ऍड. असीम सरोदे, 'इंडियन वॉटर वर्क्‍स'चे अभियंते सुरेश शिर्के, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, नीलिमा खाडे, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षक अर्चना कदम, जिवीत नदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनच्या अध्यक्षा शैलजा देशपांडे, जनवाणीच्या समन्वयक सुचित्रा जोगळेकर उपस्थित होत्या. 'लाल पूरनियंत्रणरेषेचा आदर करा' या संकल्पनेवर हे अभियान राबविण्यात आले. 

मणी म्हणाले, ''मकर संक्रांती, दसरा, दिवाळी, छटपूजा यांसारख्या विविध धर्मांच्या सणांची सुरवात व समारोप नदीशी निगडित आहे. प्रत्येक व्यक्तीचे आपले नदीशी नाते जुळलेले आहे. मधल्या काळात तुटलेले हे नाते आता जोडण्याची वेळ आली आहे, त्यामुळे नदी स्वच्छतेला अधिक महत्त्व प्राप्त होईल.'' 

स्वच्छता अभियानास सकाळी सात वाजता सुरवात झाली. ऍड. सरोदे यांनी 'रेड लाइन' व 'ब्लू लाइन' या पूररेषांसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

देशपांडे म्हणाल्या, ''नदी स्वच्छता अभियानास शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नदी व नदीच्या पूररेषेविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्‍नांना ऍड. सरोदे यांनी उत्तरे दिली.'' 

गरवारे शाळा व 'एमएनव्हीटी'चे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कमिन्स इंडियाच्या 'सीएसआर' विभागातील कर्मचारी, आदर पुनावाला फाउंडेशन आणि महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी या अभियानात आपला सहभाग नोंदविला.

Web Title: 'Muthai festival' will help to speed up river cleaning effects