Nagpur : जुनी पेन्शनसाठी लढा सुरूच : प्रशासनाचे वाढले टेंशन; कोट्यवधीचे नुकसान Nagpur Old Pension Continues Administration Tensions Raised | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी पेन्शन

Nagpur : जुनी पेन्शनसाठी लढा सुरूच : प्रशासनाचे वाढले टेंशन; कोट्यवधीचे नुकसान

नागपूर : जुनी पेन्शनसह विविध मागण्यांवरून कर्मचारी चार दिवसापासून संपावर आहेत. यामुळे कार्यालये ओस पडली आहे. कर्मचारी संपावर कायम असून त्यांच्यात अधिक जोश आला आहे. मार्च संपायला काहीच दिवस असल्याने कामे आटोपण्याचे टेंशन प्रशासनाला आले.

संपाचा आज चौथा दिवस होता. काही कार्यालयात तीन ते चार टक्के कर्मचारी असून काही कार्यालये ओस पडली पडली होती. फक्त अधिकारी कक्षात बसून आहेत. त्यांच्या हातीखाली कामे करणारे कुणीच नसल्याने ते ही अर्धा वेळ हातावर हात ठेवून बसून असल्याचे चित्र होते. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे.

कार्यालये ओस, कर्मचाऱ्यांमध्ये जोश

सेवा ठप्प असल्याने नागरिकांनाही मनस्ताप सहन होत आहे. हा आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना आहे. त्यामुळे कामे आटोपण्याची घाई प्रशासनाला आहे. काम पूर्ण न झाल्यास आणि फायलीला मंजुरी न मिळाल्यास निधी परत जाण्याची भीती आहे. निधी अखर्चित राहिल्यास त्याचे खापर अधिकाऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे प्रशासनाला टेंशन आले आहे. कामात सहभाग घेण्यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात येत आहे. परंतु कर्मचारी संपावर ठाम आहे. त्यामुळे प्रशासनाला घाम फुटला आहे.

बीडीएस अडकले

काम करण्यासाठी कर्मचारीच कार्यालयात नाही. निधी बीडीएसवर टाकल्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही. बीडीएसचा कालावधी निश्चित आहे. या काळात निधीचा वापर ना झाल्यास तो लॅप्स होतो. त्यामुळे पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागते. काही विभागाच्या बीडीएस प्रणाली अधिकाऱ्यांना हाताळता येतात. परंतु काही विभागाच्या निधीचे बीडीएस संबंधित कर्मचाऱ्याला माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकरणात अधिकाऱ्यांची चांगलीच गोची होत आहे.

नायब तहसीलदारांना कामे द्या

महसूल विभागातील कर्मचारीही संपावर आहेत. जात, उत्पन्न व इतर प्रमाणपत्राची कामे रखडलीत. यामुळे नागरिकांना अडचण होत असल्याचा मुद्दा ‘सकाळ’ने प्रकाशित केला. याची दखल घेत प्रशासनाने नायब तहसीलदारांना प्राथमिक टेबलचे काम करण्याचे अधिकार देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना दिले आहे.

कंत्राटी कर्मचारी भरण्यास मुभा

कार्मचारी संपावर असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास शासनाने हिरवा कंदील दिला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मुख्य संचिवांनी सर्व व्हीसीच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. आरोग्य व इतर महत्त्वाच्या विभागासाठी कंत्राटी कर्मचारी भरण्याच्या सूचना दिल्या.

कंत्राटी नर्सेस मिळेना

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सेस व कर्मचाऱ्यांच्या संप काळात कंत्राटी पद्धतीने नर्सेस व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचे आदेश अवर सचिवांनी दिले आहेत. मात्र, कंत्राटी नर्सेस उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सीच नाही. यामुळे संप असेपर्यंत रुग्णांचे हाल होतच राहणार आहे.

स्वाधारच्या अर्जासाठी २० मार्च ही शेवटची मुदत आहे. उपस्थित असलेले कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. शिष्यवृत्तीचे अर्जही निकाली काढण्याची कार्यवाही सुरू आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली आहे.

सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर.