नायगाव चौक बनला धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कामशेत - पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव चौक धोकादायक बनला आहे. येथे आवश्‍यक सुधारणा करून नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखावी, अशी मागणी नायगावकरांनी केली आहे.

कामशेत - पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव चौक धोकादायक बनला आहे. येथे आवश्‍यक सुधारणा करून नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखावी, अशी मागणी नायगावकरांनी केली आहे.

महामार्गावर पुणे व मुंबईच्या बाजूने येणारी वाहने वेगात येतात; परंतु या ठिकाणी रस्त्याची स्थिती धोकादायक आहे. पुण्याकडून येणारी वाहने रस्ता ओलांडताना वळण व उंचवट्यामुळे दिसत नाहीत. गेल्या महिन्यात येथे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू व दोघे जखमी झाले होते. यापूर्वीही कात्रज डेअरीसमोर सिद्धार्थनगर चौकात अनेक अपघात झाले आहेत. कात्रज डेअरीकडून रस्ता पार करताना चढ आहे, तर मुंबईकडून येणारी वाहने  वेगात येतात. दोन्ही रस्त्यांमध्ये उंच भाग आहे. नायगाव चौकात मध्येच दहा फुटांचा तीव्र उतार आहे. आयआरबी कंपनीने सुधारणा करणे गरजेचे आहे.

सेवारस्त्याची मागणी
वडगाव किंवा कामशेतला जाण्यासाठी बसथांबेही व वाहन थांबण्यासाठी जागा नाही. यासाठी सेवारस्त्याची मागणी ग्रामस्थांनी केली. परंतु, काहीही उपयोग होत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.

साइडपट्टे नाहीत
नायगावची लोकवस्ती रस्त्याच्या दक्षिणेला आहे, तर गावची संपूर्ण शेती उत्तरेकडे आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करावे लागते. बबी ढाब्यासमोर एका शेतकऱ्याला प्राण गमवावा लागला. कामशेतपासून नायगावपर्यंत रस्त्याच्या कडेने साइडपट्टी नाही. 

पट्टे आखावेत
कामशेत ते अहिरवडे फाट्यापर्यंत दोन्ही बाजूंनी सेवारस्त्याची गजर आहे. येथे लोकवस्ती मोठी आहे. त्यामुळे आवश्‍यक ठिकाणी पांढरे पट्टे आखावेत. अपघातप्रवण क्षेत्र व वाहतूक नियमांचे फलक लावावेत. 

नुसतीच आश्‍वासने
सेवारस्त्याबाबत तीन वर्षे झाले तरी आश्‍वासनापलीकडे काहीही होत नाही. ग्रामपंचायत सदस्या मधुरा ओव्हाळ, सागर येवले, प्रदीप ओव्हाळ, कुणाल ओव्हाळ यांनी सेवारस्त्याची मागणी केली आहे, तर किसन शेटे यांनी सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेने साइडपट्ट्या व्यवस्थित कराव्यात, अशी मागणी केली.

कामशेत ते अहिरवडा फाट्यापर्यंत सेवा रस्त्याची गरज आहे. या दोन्ही ठिकाणी शेतकरी व नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची गरज असून, त्यासाठी ग्रामपंचायत व संबंधितांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अपघात टळतील.
- निळकंठ जगताप,  पोलिस निरीक्षक, कामशेत

Web Title: Naigav Chowk Dangerous