दौंडमध्ये नमाज पठणानंतर पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन

प्रफुल्ल भंडारी
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

दौंड शहरात मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यासह मदत निधी संकलित करण्यात आला आहे. 

दौंड (पुणे) : दौंड शहरात मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यासह मदत निधी संकलित करण्यात आला आहे. 

दौंड शहरात साेमवार (ता. १२) ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त भीमा नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठणानंतर जामा मशिदीचे मौलाना मोहम्मद रहेमतुल्लाह यांनी पूरग्रस्तांसाठी प्रार्थना केली.

धर्मसंदेश देताना ते म्हणाले, महापुरामुळे मोठी हानी झाली आहे. पूरग्रस्त अनेक अडचणींना तोंड देत असून, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीची फार गरज असून, त्यांना साह्य करावे.

ईदनिमित्त प्रेषित महंमद पैगंबर यांचे विचार व तत्वांचा अंगीकार करत जीवनात बदल घडवावा. प्रेषितांच्या अनुयायांकडून काही चुका झाल्या असल्यास त्यांना क्षमा व्हावी. अडचणीत असलेल्या नागरिकांची मदत करण्यासह सर्वांना प्रगतीचे मार्ग दाखवावे.

राष्ट्रासह अबालवृध्दांच्या आरोग्यासाठी आणि गरजूंसाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली. समाजातील तरूणांनी नमाज नंतर पूरग्रस्तांसाठी निधी संकलित केला. आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, नगरसेवक इंद्रजित जगदाळे, पोलिस उप अधीक्षक सचिन बारी, निरीक्षक सुनील महाडीक यांच्यासह राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, आदी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: namaz pathan of idgah maidan in daund