नामदेव ढाके होणार उद्योगनगरीचे महापौर?

उत्तम कुटे
रविवार, 5 मार्च 2017

भाजपचे सच्चा कार्यकर्ते असलेले ढाके हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत. सध्या "चिंचवड'चे आमदार असलेले भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना भाजपमध्ये आणण्यात पडद्यामागे त्यांचा मोठा हात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला जगताप यांचा विरोध असणार नाही.

पिंपरी - पिंपरी-चिंचवडचे महापौरपद इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) राखीव असून तेथे कुणबी ओबीसीऐवजी खऱ्या ओबीसी नगरसेवकाला भाजप संधी देणार असल्याचे समजते. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना डावलून मूळ भाजप कार्यकर्ता असलेला नगरसेवक त्यासाठी निवडण्याचा पक्षाचा विचार सुरू आहे. मात्र एक नक्की की पहिल्यांदाच निवडून आलेला नगरसेवक उद्योगनगरीचा भाजपचा पहिला महापौर असणार. या सर्व निकषात नामदेव ढाके बसत असल्याने त्यांचे पारडे जड आहे.

राष्ट्रवादीची 15 वर्षाची सत्ता उलथवून टाकत भाजपने उद्योगनगरीत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. 14 तारखेला महापौर निवड होत असून त्यासाठी 9 तारखेपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. शहराचा पहिला नागरिक असलेल्या या प्रतिष्ठित पदासाठी दहा नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यातील काही खरे ओबीसी नाहीत. त्यामुळे खरी स्पर्धा ही चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ढाके आणि 'भोसरी'तील संतोष लोंढे या खऱ्या ओबीसीतच रंगणार आहे. त्या जोडीने भोसरीतीलच नितीन काळजे यांचेही नाव चर्चेत आहेत. मात्र, लोंढे आणि काळजे हे मूळ भाजपचे नसल्याची बाब त्यांच्या विरोधात जाणारी आहे. तर, देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपला बहुमत दिले, तर स्थानिक नगरसेवकाला महापौर करू, असे आश्‍वासन पिंपळे सौदागर येथील जाहीर सभेत दिले होते. त्यामुळे तेथील नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचेही नाव प्रबळ दावेदार म्हणून घेतले जात आहे. मात्र, ते खरे कुणबी ओबीसी असल्याने त्यांचा पत्ता या शर्यतीतून कट झाल्यात जमा आहे. तसेच ते स्वतःही या पदासाठी इच्छुक नसून पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदात त्यांना अधिक रुची असल्याचे समजते. तसेच त्यांच्या
निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने त्यांना हे पद देऊन पक्ष धोका पत्करण्याची शक्‍यता कमी आहे.

दुसरीकडे भाजपचे सच्चा कार्यकर्ते असलेले ढाके हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत. सध्या "चिंचवड'चे आमदार असलेले भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना भाजपमध्ये आणण्यात पडद्यामागे त्यांचा मोठा हात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला जगताप यांचा विरोध असणार नाही. तसेच भाजपच्या 77 पैकी पहिल्यांदाच निवडून आलेल्या 75 नगरसेवकांमध्ये संघटन कौशल्याच्या पातळीवर ते उजवे आहेत. तसेच ते खरे ओबीसीही असल्याने त्यांच्या निवडीवर आक्षेपही घेता येणार नसल्याचे त्यांच्या नावाला अधिक पसंती देण्यात आली आहे.

सत्तारूढ पक्षनेतेपदी पवार
स्थायीच्या अध्यक्षपदासाठी "चिंचवड'मधील शत्रुघ्न काटे यांचे नाव अधिक चर्चेत आहे. तर, सत्तारूढ पक्षनेते म्हणून "भोसरी'तील एकनाथ पवार यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यातून पिंपरी आणि चिंचवड असे दोन्ही विधानसभा मतदारसंघ आणि तेथील भाजपचे आमदार (दादा आणि भाऊ) यांच्यातील सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न पक्ष करणार आहे.

Web Title: Namdeo Dhake may be Mayor of Pimpri?