नाना-नानी उद्यान की मद्यपींचा अड्डा ; खेळण्यांची मोडतोड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 सप्टेंबर 2018

पौडरस्ता : उद्यान म्हटले की, हिरव्यागार गवताचा गालिचा, झाडा-फुलांनी बहरलेली जागा, तेथे खेळत असलेली लहानगी, गुजगोष्टी करणारे ज्येष्ठ असे चित्र; परंतु कोथरूडच्या संगम चौकातील नाना-नानी उद्यानात मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. मद्यपींनी तेथील सामानाची मोडतोड केली आहे. तेथील बाकडे, घसरगुंडी व खेळण्यांचे नुकसान केले आहे. 

सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकवाड यांनी सांगितले, की उद्यानात दारूच्या बाटल्यांचा ढीग पडला असून, अनेक दिवस गवत काढले नसल्याचे दिसले. एकीकडे उद्यानांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे आकडे दाखवले जातात; पण प्रत्यक्षात मात्र काहीच काम होत नसल्याचे दिसते. उद्यानांवर होणाऱ्या खर्चाची व गैरवापराची चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे. येथील मद्यपींचा तातडीने बंदोबस्त करावा व उद्यानाची तातडीने साफसफाई करावी; अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल. 

उद्यानात विजेची, सीसीटीव्हीची व्यवस्था करावी. तसेच पोलिस गस्त वाढवावी, म्हणजे गैरप्रकारांना आळा बसेल, अशी मागणी विजय पालकर, विराज डाकवे, दिनेश शेंडगे यांनी केली आहे. 

नीता अडसूळ म्हणाल्या, की मुलगा उद्यानात खेळायला गेला होता. त्याच्या पायात काच घुसल्याचे समजले, म्हणून उद्यानात आले तर येथे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. आम्ही मुलांना खेळायला कुठे पाठवायचे ते तरी सांगा. हे उद्यान काय मद्यपींसाठी बांधले आहे का ?

उद्यान विभागाचे अनिल साबळे यांनी सांगितले, की उद्यानाची जाळी तोडून काही तरुण रात्री आत येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तोडलेल्या जाळ्यांची दुरुस्ती करण्यात येईल. संबंधितांविरोधात पोलिसांत तोंडी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी येथील गस्त वाढवली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nana Nani Gardens Alcoholic Beat