नाणे मावळ : निसर्गवेड्यांना भुरळ मावळाची

भाऊ म्हाळसकर
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

बारा मावळांपैकी एक असलेल्या नाणे मावळ तसे अपरिचित आहे. परंतु भटक्‍या व निसर्गवेड्या लोकांना मावळाने भुरळ घातली आहे. उंच उंच डोंगर त्यातून वाहणारे झरे व धबधबे त्यातून अलगद वर उंचावणारी धुक्‍याची दुलई मन मोहून टाकते. मात्र नियोजन पूर्व निसर्गसहलींचा आनंद घेण्यासाठी पुरेशी तयारी आवश्‍यक आहे.

लोणावळा - बारा मावळांपैकी एक असलेल्या नाणे मावळ तसे अपरिचित आहे. परंतु भटक्‍या व निसर्गवेड्या लोकांना मावळाने भुरळ घातली आहे. उंच उंच डोंगर त्यातून वाहणारे झरे व धबधबे त्यातून अलगद वर उंचावणारी धुक्‍याची दुलई मन मोहून टाकते. मात्र नियोजन पूर्व निसर्गसहलींचा आनंद घेण्यासाठी पुरेशी तयारी आवश्‍यक आहे.

काय पाहाल
श्री कोंडेश्‍वर मंदिर (जांभवली) 
नाणे मावळातील शेवटचे टोक असलेले जांभवली येथील श्री क्षेत्र कोंडेश्‍वर हे प्राचीन तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार केला आहे. चोहोबाजूंनी डोंगररांगा, शेजारून वाहणाऱ्या कुंडलिका नदीचा उगमही येथूनच होतो. महाशिवरात्री, श्रावणात येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. मंदिरामागील पाण्याची कुंडे प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने पाण्यात उतरताना खबरदारी घ्यावी.

मार्ग - जांभवली गावातून कोंडेश्‍वर मंदिराकडे पायी (अर्धा तास) अथवा दुचाकीने जाता येते. कामशेत येथून जांभवलीस नाणे, कांब्रे, गोवित्री, वडवली, भाजगाव, थोरान असे जाता येते जाता येते.

महामार्गापासून कामशेत येथून जांभवली २२  किलोमीटर. 
तळेगाव (कामशेत) - जांभवली एसटीने ही जांभवली जाता येते. मात्र वेळांची माहिती हवी. 
जांभवली व थोरान येथे गावातच जेवणाची व राहण्याची सोय होऊ शकते 
पेट्रोल पंप कामशेत येथे २३ किलोमीटर
दवाखाना कामशेत २२ किलोमीटर
पंक्‍चर काढण्याची सोय, नाणे १९ किलोमीटर

पाले लेणी 
उकसानपासून उजवीकडे अपूर्ण अवस्थेत बांधलेली प्राचीन पाले लेणी आहे. पाण्याची कुंड, गुहा, ब्राह्मी लिपीत कोरलेला शिलालेख पाहता येतो. चालत अंतर साधारणपणे दोन तास, सोबत माहीतगार असल्यास उत्तम, कामशेतपासून अंतर साधारणतः १५ किलोमीटर.

जेवण कोठे कराल?
जाण्यापूर्वी सोबत न्याहारी असणे आवश्‍यक आहे
जांभवली, थोरान येथे घरगुती पिठले-भाकरी व मिरची सोय
ग्रामस्थांना तशी ऑर्डर दिल्याप्रमाणे जेवणाची सोय होते.

ढाकचा बहिरी
परिसरातील भाविकांसह हौशी पर्यटक व गिर्यारोहकांचे ढाक हे पसंतीचे ठिकाण आहे. कोंडेश्‍वर मंदिरामागून प्रसिद्ध व अवघड समजला जाणाऱ्या ढाकच्या बहिरीस जाता येते. मात्र पावसाळ्यात येथे जाण्याचे साहस करू नये.

कळकराय सुळका
अत्यंत कठीण मानला जाणाऱ्या कळकराय सुळका हे गिर्यारोहकांचे पसंतीचे ठिकाण. या ठिकाणी रॉक क्‍लायबिंग करता येते. 
दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी अंदाजे कोंडेश्‍वरपासून पायी साधारणतः दोन तास

घोडोबा मंदिर (शिरवता)
कोळवाडीच्या पुढे शिरोता धरणाकडे जाताना रस्त्यालगत श्री कोंडेश्‍वराच्या समकालीन घोडोबा मंदिर हेही सुंदर ठिकाण आहे. कामशेत-जांभवली रस्त्यावर डावीकडे शिरवता धरणाकडे वळल्यावर मंदिर नजरेस येते.   
कामशेतपासून शिरवता १५ किलोमीटर
हॉटेलव्यवस्था नाही. सोबत शिधा असावा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nane Maval Tourism Nature Environment Rain Waterfall