नाणेघाटात पोलिस बंदोबस्ताची मागणी

दत्ता म्हसकर
शनिवार, 7 जुलै 2018

नाणेघाटात शनिवार व रविवार शिवाय अन्य सुट्टीच्या दिवशीही पर्यटकांची मोठी गर्दी असते. सर्वत्र पसरलेला हिरवाईचा गालिचा, कोसळणारे धबधबे, खळखळून वाहणारे ओढे-नाले, दाट धुके, गार वारा व धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या सरींचा आनंद लुटण्यासाठी पुणे, ठाणे, मुंबई, नगर, नाशिक आदी ठिकाणाहून पावसाळ्यात पर्यटक येथे येत असतात. पावसाळ्यातील पर्यटकांची ही गर्दी दरवर्षी वाढत आहे. याच बरोबर येथे मद्यपान करणाऱ्या तरुणांची संख्या देखील वाढत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. 

जुन्नर : ऐतिहासिक नाणेघाटात धांगडधिंगा करणाऱ्या मद्यपी तरुणांना रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त असावा, घाटघर येथील पोलीस चौकी कार्यरत करावी अशी मागणी घाटघर ग्रामस्थांनी केली आहे.

नाणेघाटात शनिवार व रविवार शिवाय अन्य सुट्टीच्या दिवशीही पर्यटकांची मोठी गर्दी असते. सर्वत्र पसरलेला हिरवाईचा गालिचा, कोसळणारे धबधबे, खळखळून वाहणारे ओढे-नाले, दाट धुके, गार वारा व धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या सरींचा आनंद लुटण्यासाठी पुणे, ठाणे, मुंबई, नगर, नाशिक आदी ठिकाणाहून पावसाळ्यात पर्यटक येथे येत असतात. पावसाळ्यातील पर्यटकांची ही गर्दी दरवर्षी वाढत आहे. याच बरोबर येथे मद्यपान करणाऱ्या तरुणांची संख्या देखील वाढत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. 

माळशेज घाटात वर्षा विहारासाठी येणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून प्रतिबंध होण्यास सुरुवात झाली की ही मंडळी नाणेघाटाकडे वळतात. येथे मद्यपान व मांसहाराच्या पार्ट्या करुन गोंधळ घालणे, भांडणे-हाणामारी करणे, महिलांची छेडछाड करणे या सारखे प्रकार नेहमीच होत असतात. त्याचा पर्यटक,स्थानिक हॉटेल व्यावसायिक तसेच नागरिकांना त्रास होतो. येथे पोलीस बंदोबस्त नसल्याने मद्यपी तरुणांना इतर कोणाची भिती वाटत नाही. जुन्नर पोलीसांनी याची वेळीच दखल घेऊन नाणेघाट व परिसरात येणाऱ्या पर्यटकांची नाका बंदी करून तपासणी करणे. मद्यपीवर तसेच डीजे लावून धांगडधिंगा करण्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांना सुरक्षितता वाटावी यासाठी पोलीस प्रशासनाने यापुढे मद्यपी व टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याची गरज आहे.

घाटघर येथे ब्रिटिश कालीन पोलीस चौकी आहे. येथे कागदोपत्री कर्मचारी नियुक्त केलेला असतो. परंतु तो येथे फिरकतही नाही. ही बंद असलेली चौकी सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

नाणेघाट हा वन व पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने या दोन्ही विभागाचे नियुक्त कर्मचारी येथे उपस्थित राहिल्यास काही प्रमाणात जरब राहील. स्थानिक वनहक्क समितीने येथे उपद्रव शुल्क सुरू करावा तसेच अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

Web Title: Naneghat should be under police control