‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

बारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो. शिक्षणात नापास झालो, तरी मासिक पाळी, स्वच्छता आणि कृतीयुक्त अध्यापनात झालेल्या कामातून इंग्लडच्या राणीलाही भेटीचे औत्सुक्‍य वाटले, तेव्हा मात्र वडिलांच्या नजरेत मी ‘पास झालो होतो’. ही प्रवीण निकम याने ‘नापास मुलाची गोष्ट’ही गोष्ट सांगितली. तेव्हा शारदानगरच्या सभागृहात युवतींकडून फक्त टाळ्यांचाच कडकडाट होत राहिला.

स्वयंसिद्धा संमेलनात प्रवीण निकम याने ‘नापास मुलाची गोष्ट’ या विषयावर युवतींशी संवाद साधला. या वेळी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, आर. एस. लोहोकरे आदी या वेळी उपस्थित होते. 

प्रवीण म्हणाला, ‘‘अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, काहीच जमत नव्हते. सेमिस्टरची परीक्षा जवळ आली आणि याचदरम्यान बाबांनी परवानगी दिल्याने ईशान्येकडील राज्यांचा अभ्यास करायला मित्रासोबत बाहेर पडलो. अर्थात तेव्हा बाबांच्या कंपनीचा दोन महिने पगार झाला नव्हता. आसाममध्ये आदिवासी भागात गेलो. तोपर्यंत मला माझ्या भागापेक्षा वेगळा भारत आहे, हेच वाटत नव्हते. तिथे एका गावात एक रोशनी नावाची आदिवासी मुलगी शाळेत जात नव्हती. विचारले असता, मासिक पाळी म्हणजे देवाने दिलेली शिक्षा आहे, असा समज असल्याचे उत्तर मिळाले आणि हबकून गेलो. ते वय मलाही कळण्याजोगे नव्हते. मात्र याच विषयावर काम करण्याचे ठरवले. पुण्यात आलो. तेव्हा अभियांत्रिकीचा निकाल नापास असा आलाच होता. मी तणावात गेलो. शिक्षण सोडून दिले.

सहा दिवसांनंतर आत्महत्या करायची असे ठरवले; पण त्याचदरम्यान एका महाविद्यालयात सहज जाऊन बसलो आणि पोलिटिकल सायन्स हा विषय आवडला. प्रवेश घेतला, पण आसाममधील रोशनी स्वस्थ बसू देत नव्हती. १५० जणांचा ग्रुप तयार केला आणि पुण्याच्या वस्तीत लोकांना भेटू लागलो.

वस्त्यांमध्ये मुलांना कृतियुक्त अध्यापन शिकवतानाच मासिक पाळी या विषयावर काम करायचे ठरवले. योगायोगाने ‘बार्टी’मध्ये मासिक पाळी- स्वच्छता या विषयाचे प्रशिक्षण घेतले. शाळांमध्ये मासिक पाळीवर बोलू नका, नाहीतर आमची शाळा बंद पडेल, असे सांगितले गेले. पण जर महिलांपर्यंत पोचायचे, तर त्यांच्या मुलांपर्यंत पोचायला हवे, हे लक्षात आल्याने मोफत कृतियुक्त अध्यापनाची सुरवात केली. मोफत वर्ग म्हटल्यावर असंख्य मुले येऊ लागली. आमच्यावर विश्वास वाढत गेला. मग आम्ही गुड टच, बॅड टचवर बोलू लागलो.

हळूहळू लैंगिक शिक्षणावर बोलू लागलो आणि मासिक पाळी, महिला आरोग्यावर काम सुरू झाले. ते काम एवढे वाढले की, युनोपासून ते इंग्लडच्या राणीच्या भेटीपर्यंत आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही खरेच काहीतरी वेगळे करीत आहोत, हे पाहिल्यानंतर बाबांनीही मी खऱ्या अर्थाने आयुष्याच्या परीक्षेत ‘पास’ झाल्याची शाबासकी दिली.
- प्रवीण निकम

Web Title: Napas Mulachi Gost Discussion Pravin Nikam