नारायणगावच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना पाठविल्या राख्या  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सबनीस विद्यालयातील स्काउट गाइडमधील विद्यार्थिनींनी सुमारे चारशे राख्या व शुभेच्छा पत्र तयार केली आहेत. या राख्या व शुभेच्छा पत्र रक्षाबंधनानिमित्त सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी पाठवल्या आहेत. 

नारायणगाव (पुणे) : देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांसाठी येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालयातील स्काउट गाइडमधील विद्यार्थिनींनी सुमारे चारशे राख्या व शुभेच्छा पत्र तयार केली आहेत. या राख्या व शुभेच्छा पत्र रक्षाबंधनानिमित्त सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी पाठवल्या आहेत. 

येथील सबनीस विद्यालयात सैनिक व माजी सैनिकांसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. जयपूर येथे भारतीय सैन्यदलात सुभेदार पदावर कार्यरत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी मेजर उमेश पांडुरंग अवचट यांना राखी बांधून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गाइड कॅप्टन अनुपमा पाटे, स्काउट संकेत थोरात, गाइड सानिका दिवेकर यांनी सैनिकांसाठी लिहिलेल्या निवडक शुभेच्छा पत्रांचे वाचन केले. 

या वेळी मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, उपमुख्याध्यापक रमेश घोलप, माजी सैनिक किसनराव ढवळे, चंद्रकांत मुळे आदी उपस्थित होते. सबनीस विद्यालयातील स्काऊट गाइडमधील विद्यार्थिनींनी गाइड कॅप्टन पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभेच्छा संदेश व राख्या सैनिकांसाठी तयार केल्या आहेत. विद्यार्थिनींनी पूजन करुण चारशे राख्या पाकिटात सीलबंद करुण जम्मू, काश्‍मीर, जयपूर, लडाख, कारगिल येथे भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी मेजर अवचट यांच्या हस्ते पाठवण्यात आल्या. 

मेजर अवचट म्हणाले, ""समाजाच्या पाठिंब्यामुळे सैनिकांना पाठबळ मिळते. युवा पिढी व शालेय विद्यार्थी देशाचे भवितव्य आहे. विद्यार्थिदशेत अभ्यासाबरोबरच नियमित व्यायाम करा, अंगी शिस्त बाळगा, नियमांचे पालन करा, मोबाईलचा वापर मर्यादित करा.'' 

या वेळी माजी सैनिक ढवळे, मुळे यांनी सेवेतील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे नियोजन गाइड कॅप्टन पाटे, सुनील ढवळे, निर्मला मेहेर, खरजुले यांनी केले. 

सैनिक हेच देशाचे खरे हिरो आहेत. सैनिकांचा त्याग, देशप्रेम, शिस्त, स्वावलंबन आदी गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास देशाची भावी पिढी सक्षम होईल. सैनिक, माजी सैनिक व कुटुंबीय यांच्याविषयी समाजात कृतज्ञतेची भावना असणे आवश्‍यक आहे. 
- रवींद्र वाघोले, मुख्याध्यापक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayangaon students sent rakhi to soldiers