नारायणपूर, दिव्यात होणार वीज उपकेंद्र 

representational image
representational image

सासवड : सासवड (ता. पुरंदर) आणि परिसरातील 31 गावठाणासह कृषिपंपांसाठी वाढलेली विजेची मागणी पूर्ण करण्यास येथील 25 वर्षांपूर्वीचे जुने वीज उपकेंद्र असमर्थ ठरत आहे. त्यामुळे या उपकेंद्रावरील भार हलका करण्यासाठी नारायणपूर आणि दिवे येथे उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी महावितरणच्या मुख्यालयात दाखल झाला आहे. त्याबाबत पाठपुरावा करून तो मंजूर करून घेण्याची गरज आहे. 

सासवड येथे वीज उपकेंद्र उभारून तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात सासवड आणि परिसरातील गावठाणासह कृषिपंपासाठीही विजेची मागणी वाढत आहे. ही मागणी येथील उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर अपुरे पडत आहेत. सध्याच्या कार्यक्षेत्रासाठी आणखी किमान 10 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरसह वीज उपकेंद्र उभारणीची गरज आहे. त्यातूनच नारायणपूर येथे 5 एमव्हीए क्षमतेचे, तर दिवे येथे 10 एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मरसह वीज उपकेंद्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव (आवश्‍यक आराखडा, अंदाजपत्रकासह) चार महिन्यांपूर्वी महावितरणच्या प्रकाशगड या मुख्य कार्यालयात दाखल करण्यात आला आहे.

राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सूचनेवरून हा प्रस्ताव आल्याचे सांगण्यात आले. दिवे उपकेंद्राला अंदाजे 5 कोटी व नारायणपूर उपकेंद्राला 3 कोटी असा किमान 8 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. 

मागणीमुळे नव्या उपकेंद्रांची गरज 
सासवड आणि लगतच्या 30 गावांतील कृषिपंपांच्या वीज पुरवठ्यासाठी एक आणि गावठाणासाठी दुसरे असे 10 एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर सासवड वीज उपकेंद्रात आहेत. त्यातील एकात बिघाड झाल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. ही अडचण पुन्हा निर्माण होऊ शकते. त्यामुळे बोपगाव व फुरसुंगीकडून वीज घेण्याची कसरत टाळण्यासाठी नवी उपकेंद्रे उभारणे गरजेचे आहे. 

आजची स्थिती आणि 1993 ची स्थिती यात फरक आहे. भविष्यात वाढणारी विजेची मागणी लक्षात घेऊन नारायणपूर आणि दिवे (ता. पुरंदर) येथे अनुक्रमे 5 व 10 एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे वीज उपकेंद्र विचाराधीन आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव दाखल केला असून, मंजुरीसाठी पत्रव्यवहार झाला आहे. ऊर्जामंत्र्यांशी संवाद साधून पाठपुरावा करीत आहे. येत्या काही काळात वीज प्रश्न सुरळीत होईल. 

- विजय शिवतारे, राज्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com