पुणे : श्रीक्षेत्र नारायणपूरला जाणारा मार्ग कापूरव्होळ येथे बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

भोर-कापूरव्होळ-नारायणपूर मार्गावरील चिव्हेवाडी  घाटातील रस्ता व छोटा पूल वाहून गेल्याने हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.

भोर : बुधवारी (ता. २६) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ-किकवी 
परिसरातील रस्ते, भातशेती, स्मशानभूमी व विद्युत पंपांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तर भोर-कापूरव्होळ-नारायणपूर मार्गावरील चिव्हेवाडी  घाटातील रस्ता व छोटा पूल वाहून गेल्याने हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.

सुदैवाने पाऊस मध्यरात्री झाल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. पावसामुळे केतकावळे (ता.भोर) येथील तलावातून पाणी मोठ्या क्षमतेने वाहू लागले. केतकावळे, दिवळे, हरिश्चंद्री व कापूरव्होळ या गावातील शेतक-यांच्या  भातशेतीचे आणि गावांच्या स्मशानभूमीचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पाण्याच्या मोटारी, विद्युतगृह वाहून गेले.

भातखाचरांमध्ये डोंगरातील राडारोडा वाहून आला असून काही खाचरांचे बांध फुटले आहेत.  निगडे, धांगवडी व किकवी येथील 
रस्ते पाण्याखाली गेले, तर किकवीतील दलितवस्तीत पाणी शिरले. किकवी-मोरवाडी-पाचलिंगे मार्गावरील रस्ता वाहून गेला. कापूरव्होळ-नारायणपूर मार्गावरील चिव्हेवाडी घाटात राडारोडा आल्याने हा मार्ग कापूरव्होळ येथे बंद करण्यात आला. त्यामुळे गुरुवारी (ता.२६) भाविकांना नारायणपूरला जाता येणार नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

दरम्यान तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाच्या गाव कामगार तलाठी व इतर शासकीय विभागाच्या कर्मचा-यांना दिले असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले. याशिवाय पुढील पाच दिवसात सर्वांना दक्ष राहण्याचे आदेश दिले असल्याचेही तहसीलदार अजित पाटील यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayanpur road Close on near Kapoorhol