#PuneTraffic अरुंद रस्ते, खड्डे अन्‌ बेशिस्त वाहनचालक

#PuneTraffic अरुंद रस्ते, खड्डे अन्‌ बेशिस्त वाहनचालक

रस्त्यांची अर्धवट कामे, अरुंद रस्ते, पावसामुळे पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते वाढले नाहीत; मात्र वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच अशक्त झालेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खासगी वाहनांकडे वळावे लागत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पुणेकरांनी ‘सकाळ संवाद’ला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या विश्‍लेषणावरून हा निष्कर्ष निघाला आहे.

वाहतुकीची कोंडी होण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे खासगी वाहनांची बेसुमार संख्या आहे. चार मीटरपेक्षा जास्त लांबीच्या चारचाकी गाड्यांची संख्या एकूण रस्त्यावर असणाऱ्या वाहनांमध्ये २८ ते ३० टक्के आहे. या गाड्यांमधून एक किंवा दोन जण प्रवास करतात. या वाहनांची संख्या कमी केल्याशिवाय कोंडी कमी होणे अवघड आहे.
- डी. टी. देवरे, वाहतूक विषयावरील अभ्यासक

वाहतूक कोंडी
सेनापती बापट रस्त्यावरून दररोज ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. वाढविलेल्या पादचारी मार्गावरून वाहनचालक घुसखोरी करत आहे. पुढे चतु-शृंगी ते शेती महामंडळ या मार्गावर ‘नो पार्किंग - नो हॉलटिंग’ असे बोर्ड असूनही वाहनचालक सर्रास वाहने उभी करतात. प्रत्येक चौकात पोलिस अभावाने थांबलेले दिसतात. त्यामुळे सिग्नल तोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
- सौरभ निकम

वाघोलीमध्ये वाहतुकीचा प्रश्‍न बिकट आहे. हिंजवडीनंतर आता वाघोलीदेखील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे वाघोलीदेखील आता वाहतूक कोंडीसाठी ओळखले जाईल. 
- आशिष सोनावणे

कात्रज-आंबेगाव, दत्तनगर-जांभूळवाडी रस्त्यावर बेशिस्त वाहतूक, वाढणारे अतिक्रमणे, सिग्नलप्रणालीतील त्रुटी, चौकांतील खड्डे याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. नुसते प्रशासनाला बोलून पण काय फायदा नाही कारण नागरिकांनी पण वाहतुकीचे नियम पाळव नाही. 
- प्रशांत करकंडे

विठ्ठलवाडी ते माणिकबाग या रस्त्यावर सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत वाहतूक कोंडी होते. त्याच वेळी स्वारगेटकडे जाणारा रस्ता मात्र रिकामा असतो. नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केली जात असल्याने व रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे ही समस्या उद्‌भवत आहे.
- अश्विनी पाठक

वाहतूक कोंडी ही पुण्याची गंभीर समस्या आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या नागरीकरणामुळे आता अमर्यादित वाहनांवर नियंत्रण ठेवणे शक्‍य नाही. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
- रवींद्र

जोपर्यंत पुणेकर वाहतुकीचे नियम काटेकोर पाळणार नाही; तोपर्यंत पुण्याच्या वाहतूक कोंडीला देव पण सोडवू शकणार नाही. 
- राम पाटील

ॲमनोरा पार्क टाऊन ते मुंढवा बस स्टॉप येथे दररोज वाहतूक कोंडी हो आहे. यामुळे सात किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासभर लागत आहे. 
- राहुल भुजबळ

निघोजे चाकण ते पुणे स्टेशनपर्यंत दररोज तलावडे चौक, दापोडी, डेक्कन कॉलेज, येरवडा, येरवडा पूल येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हे अंतर पार करण्यासाठी केवळ ५५ मिनिटे लागतात. परंतु कोंडीमुळे आता ९० ते १२० मिनिटे वेळ लागत आहे.
- शीतल मुदगल

कात्रज-मुंबई बायपास रस्ता वडगावपासून आरएमडी कॉलेजपर्यंत रोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.  
- महेश पुंडे

अरुंद रस्ते
धायरी आणि नऱ्हे येथील रस्ते अरुंद असून सिंहगड रस्ता व पुणे मुंबई महामार्गास जोडणारे आहेत. परिणामी, या मार्गांवर चोवीस तास वाहतूक कोंडी होत असते.
- कपिल मोरे 

भुमकर चौकापासून हिंजवडी फेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंपकिन पॅच शाळेजवळील रस्ता अरुंद आहे. कात्रज बायपासवर सूसरोड फाट्यापूर्वी नवीन उड्डाण पुलाच्या बाजूला खड्डे पडले आहेत. वारजे उड्डाण पुलाकडून कात्रज बायपासकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्यावर देखील खड्डे पडले आहेत. वडगाव पुलाच्या सुरवातीलाही मोठे खड्डे पडले आहेत.  
- युवराज महादार

नियोजनाचा अभाव
सिंहगड रस्त्यावर सकाळी-संध्याकाळची वाहतूक कोंडी आता नित्याची झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सिंहगड रस्त्याचा विकास नियोजनशून्य झाल्याने ही समस्या निर्माण होत आहे. 
- अमोल मोकाशी

बेशिस्त वाहन चालक, अवैध पार्किंग, रस्ता  रुंदीकरण, नियोजनाचा अभाव, सिग्नलप्रणालीतील त्रुटींमुळे वाहतूक कोंडीची समस्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. 
-एक वाचक

खड्डे
पाषाण तलावाजवळील बायपास मार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून अनेक खड्‌डे पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच सिंहगड पुला ते नऱ्हे पुलापर्यंत देखील वाहतूक कोंडी होत आहे.
-स्वप्नील

नांदे-चांदे ते कोथरूडहून हिंजवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्‌डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पाषाण तलावाजवळही खड्डे पडले आहेत. महामार्गामुळे संध्याकाळी दररोज वाहतूक ठप्प होते.
-केदार 

एकेरी वाहतूक
कवडे नगरपासून पिंपळे गुरव ते मगरपट्टासाठीकडे जाताना खडकी पुलाजवळ एकेरी वाहतूक व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. अशीच परिस्थिती नगरस्त्यावर देखील दिसते. 
-प्रवीण धांडे

अतिक्रमण
वारजे जकात नाका ते हायवे चौक येथे पदपाथवर टेंपोसह इतर वाहने उभी केली जातात. तसेच भाजी विक्रेतेही दुकान थाटतात. ३ किलोमीटरचा हा रस्ता पार करण्यासाठी १० मिनीट वेळ पुरेसा आहे. पण रोज वारजे नाक्‍यापासून ते शिवणेपर्यंत जायला आता एक तास लागत आहे.
- संजय वाल्हेकर

अवैध पार्किंग
वारजे माळवाडी ते शनिवार वाडामधील अंतर पार करण्यासाठी  तसा २० मिनिटांचा वेळ लागतो. मात्र आता वारजेमधून बाहेर पडायलाच २० मिनिटे लागतात. कारण या ठिकाणीची अतिक्रमण आणि बेकायदेशीर पार्किंग मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
-आशिक सय्यद

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकडे कधी कधी वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पावत्या फाडण्यामध्ये मात्र ते नेहमी व्यस्त दिसत आहे.  
- डॉ. अजित कदम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com