असीम प्रेमामुळेच रंगभूमीवर अभिनय - नसीरुद्दीन शाह

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड : तन्वीर सन्मान सोहळ्यात अनौपचारिक संवादात रमलेले नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक आणि दीपा लागू.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड : तन्वीर सन्मान सोहळ्यात अनौपचारिक संवादात रमलेले नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक आणि दीपा लागू.

पुणे - ‘चार दशके मला रंगभूमीवर काम करायला मिळाले, याबद्दल मी नशीबवान आहे; पण मी हा काही कुणावर उपकार केलेला नाही, तर ते माझे प्रेम आणि ‘खुजली’ होती,’’ अशा शब्दांत अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी नाटकांवरील असीम प्रेमाची कबुली दिली.

रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ‘तन्वीर सन्मान’ शाह यांना, तर ‘नाट्यधर्मी पुरस्कार’ महाराष्ट्र कल्चरल सेंटरला सोमवारी देण्यात आला. या वेळी प्रतिष्ठानच्या दीपा लागू, दिग्दर्शक गोविंद निहलानी, रत्ना पाठक-शाह, सेंटरच्या शुभांगी दामले, प्रमोद काळे, किरण यज्ञोपवित उपस्थित होते. सेंटरच्या वतीने दामले आणि काळे यांनी पुरस्कार स्वीकारला. यज्ञोपवित यांनी मनोगत व्यक्त केले.

शाह म्हणाले, प्रामाणिक अभिनय म्हणजे काय, असे मला नेहमी विचारले जाते; पण अभिनयामध्ये अप्रामाणिकपणा असू शकतो का? तसेच परफेक्‍शन, अशी कोणतीच गोष्ट अभिनयात नसते. अभिनेत्याला चांगला-वाईट, प्रामाणिक, अशा श्रेण्यांमध्ये बांधणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. ‘श्रीराम लागू यांच्याकडून खूप शिकायला मिळाले; पण त्यांच्याबरोबर रंगभूमीवर काम करता आले नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्‍त केली.

निहलानी म्हणाले, ‘नसीर आणि ओमपुरी यांची भेट गिरीश कार्नाड यांच्यामुळे झाली. त्या वेळी कार्नाड म्हणाले होते की, हे कलाकार म्हणून चांगले आहेत; पण तंग करणारेही आहेत. पुढे एकत्र काम करताना तसा प्रत्ययही आला. नसीर यांना राग खूप लवकर येत असे. त्यांना शांत ठेवण्यासाठी खूप युक्‍त्या योजाव्या लागत असत.’
‘चांगला अभिनेता हा मनगटावरील घड्याळ्यासारखा असतो. त्याच्या आत भरपूर काही सुरू असते; पण त्याची टिकटिक काही ऐकू येत नाही. अनेक कलाकार हे अभिनय करताना दिसतात; पण काही कलाकार ही पात्रेच बनून जातात. हाच सामान्य आणि चांगल्या कलाकारातील फरक आहे.’

रत्ना पाठक यांनी शाह यांचा अभिनेता आणि दिग्दर्शक हा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, ‘नसीर खूप चांगले विद्यार्थी आहेत. त्यांना अभिनयासाठी काही नवे सापडले तर ते स्वत:मध्ये रुजविण्यासाठी आधाशी बनतात. रंगभूमी हेच कायम त्यांचे प्रेम राहिले आहे. ते सतत शिकत राहतात, स्वत:मध्ये बदल करीत राहतात. ही प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे. ते अभिनेता म्हणून मोठे आहेतच. माणूस म्हणूनही ते खूप मोठे आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com