औद्योगिक सुरक्षिततेसाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

राज्यातील कारखान्यांमध्ये शून्य अपघातांचे ध्येय गाठण्यासोबतच कामगारांचे आरोग्य, कल्याण आणि सुरक्षितता यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय प्रयत्नशील आहे. विशेषतः महिला कामगारांसाठी आवश्‍यक सुविधा देण्याबाबत बदल करण्यात येत आहेत. 
- जयेंद्र मोटघरे, संचालक, औद्योगिक सुरक्षितता 

पुणे - राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या वतीने गोदरेज प्रॉपर्टीजचे सुरक्षा अधिकारी संतोष जगताप यांचा "व्होकेशनल एक्‍सलन्स सेफ्टी पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. राज्याच्या औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य संचालनालयाचे संचालक जयेंद्र मोटघरे यांच्या हस्ते कारखान्यातील सुरक्षिततेसाठी काम करण्यासोबतच समाजात सुरक्षेविषयी जाणीव निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि अपघातग्रस्त व्यक्‍तींचे प्राण वाचविणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी दिवंगत माता-पित्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला आहे. जगताप यांनी कारखान्यात विनाअपघात 17 लाख मानवी तासांच्या वैविध्यपूर्ण सुरक्षा कामासोबतच सासवड, उंड्री, लोणी काळभोर येथील अपघातात सापडलेल्या जखमींचे आणि वन्य प्राण्यांचेही प्राण वाचविले आहेत. तसेच अवयवदानाबद्दल जागृती करून मृत्यूनंतर भाच्याचे अवयवदान करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 

दिलीप देशपांडे म्हणाले, ""लहान व मध्यम स्वरूपाच्या कारखान्यांना सुरक्षा अधिकारी नेमणे परवडत नाही. त्यांची सुरक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी "इंडस्ट्रिअल सेफ्टी को-ऑर्डिनेटर'सारख्या कमी कालावधीचे अभ्यासक्रम संस्थेने विकसित केले आहेत.'' 

या वेळी सुरक्षा अधिकारी सचिन पोरे यांना मेरिटोरियस स्टुडंट पुरस्काराने आणि विनायक पाटील यांना बेस्ट सेफ्टी स्टुडंट पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे प्राचार्य व उपाध्यक्ष नरेंद्र पोतनीस यांनी राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे महत्त्व सांगितले. खजिनदार एम. एन. केळकर यांनी सर्वांना सुरक्षिततेची शपथ दिली. सचिव एस. जी. क्षीरसागर, माधव गांगल, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक रणदिवे, खोत, विविध कारखान्यांमधील सुरक्षा अधिकारी, मालक या वेळी उपस्थित होते. 

राज्यातील कारखान्यांमध्ये शून्य अपघातांचे ध्येय गाठण्यासोबतच कामगारांचे आरोग्य, कल्याण आणि सुरक्षितता यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय प्रयत्नशील आहे. विशेषतः महिला कामगारांसाठी आवश्‍यक सुविधा देण्याबाबत बदल करण्यात येत आहेत. 
- जयेंद्र मोटघरे, संचालक, औद्योगिक सुरक्षितता 

Web Title: National Security Day

टॅग्स