राष्ट्रवादी काँग्रेस डॉ. अमोल कोल्हे यांना वापरून घेत आहे : डॉ. निलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

"सरकारनामा फेसबूक लाईव्ह'मध्ये बोलताना त्यांनी शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील निश्‍चितपणे निवडून येतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

पुणे : ''लोकसभेचे शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस वापरून घेत आहे. शिवसेना सोडल्याचा निवडणुकीनंतर त्यांना निश्‍चितपणे पश्‍चाताप होईल.'',असे मत शिवसेनेच्या प्रवक्‍त्या निलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. पश्‍चिम महाराष्ट्रात महायुतीला चांगले यश मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

"सरकारनामा फेसबूक लाईव्ह'मध्ये बोलताना त्यांनी शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील निश्‍चितपणे निवडून येतील, असा विश्‍वास व्यक्त केला. शिवसेना कुणीही सोडली तरी केवळ ती व्यक्ती पक्ष सोडत असते. शिवसैनिक जागचा हालत नाही, असा इतिहास आहे. त्यामुळे आढळराव-पाटील यांचा विजय निश्‍चित असल्याचे स्पष्ट केले. डॉ. कोल्हे यांना पक्षात कोणतीच अडचण नव्हती. मात्र, अचानक एकेदिवशी त्यांची पक्ष सोडल्याची बातमी मिळाली. पक्षाने त्यांना खूप काही दिले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी पक्ष सोडायला नको होता, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या पक्ष सोडण्याचे काहीही फरक पडणार नाही. आढळराव यांचा ते पराभव करू शकणार नाहीत. 

मावळ मतदारसंघातदेखील श्रीरंग बारणे यांचे गेल्या पाच वर्षातील खासदार म्हणून काम चांगले आहे. आदर्श खासदारासाठीचा संसदरत्न पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. त्यांच्यासाठी मतदारसंघात चांगले वातावरण आहे. त्यामुळे त्यांना निवडून येण्यात कोणतीच अडचण नसल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेसह महायुतीला राज्यात चांगले वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश मिळेल, असा दावा डॉ गोऱ्हे यांनी केला. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होत असली तरी शिवसेनेच्या मतावर त्याचा कोणताही परिणाम शक्‍य नाही. मुंबईदेखील काहीही फरक पडणार नाही, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. 
 

Web Title: Nationalist Congress Party is using Dr. Amol Kolhe says Dr. Nilam Gorhey