राष्ट्रभक्तीची धून अन्‌ "सुखोई'ची सलामी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

""आपल्या मुलांना "एनडीए'मध्ये प्रशिक्षणासाठी पाठविणाऱ्या पालकांचे मनापासून धन्यवाद. या मुलांबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आहे. या मुलांमध्ये कौशल्य विकसित करणारे प्रशिक्षक, लष्करी अधिकारी आणि कमांडंट यांची कामगिरी कौतुकास्पद आहे,''
डॉ. सुभाष भांमरे, संरक्षण राज्यमंत्री

"एनडीए'त विद्यार्थ्यांचे शानदार दीक्षान्त संचलन; खडतर तपश्‍चर्यापूर्तीचा जल्लोष

पुणे : सकाळची अल्हाददायक थंडगार हवा..."सारे जहॉं से अच्छा'च्या धूनवर होणारे शिस्तबद्ध संचलन... प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे जाणारी एक-एक तुकडी... त्याच वेळी "सुखोई'ने दिलेली सलामी... क्षणाक्षणाला वाढत जाणारे राष्ट्रप्रेम आणि अभिमानाने फुगणारी छाती... अशा वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 131 व्या तुकडीचे मंगळवारी दीक्षान्त संचलन थाटात पार पडले.

विद्यार्थ्यांनी "अंतिम पग'च्या दिशेने मार्गक्रमण केल्यानंतर या शानदार संचलनाची सांगता झाली."एनडीए'मधील खेत्रपाल मैदानावर हा सोहळा झाला. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी पालकांसह लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भांबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हरिझ, "एनडीए'चे प्रमुख कमांडंट एअर मार्शल जसजित सिंह क्‍लेर, उपप्रमुख रिअर ऍडमिरल ए. के. ग्रिव्हल, प्राचार्य प्रा. ओ. पी. शुक्‍ला उपस्थित होते. ऍकॅडमी कॅडेट कॅप्टन चंद्रकांत आचार्य याने राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळविले. ऍकॅडमिक कॅडेट ऍड्युटंट हेमंत पुनिया याला रौप्य, तर स्क्वाड्रन कॅडेट कॅप्टन ए. एस. धत्त याला ब्रॉंझपदकाने गौरविण्यात आले. "चीफ ऑफ स्टाफ बॅनर' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नोव्हेंबर स्क्वाड्रनने पटकाविला.

आनंद, जल्लोष...
शिस्तबद्ध संचलन करून "अंतिम पग'ची पायरी ओलांडताना अत्यंत खडतर लष्करी प्रशिक्षणाची तीन वर्षे विद्यार्थ्यांनी यशस्वी पूर्ण केल्याची भावना या वेळी होती. त्यामुळे संचलनाचे मैदान सोडून बाहेर येताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या यशाबद्दल आनंद दिसत होता.

"सुखोई'ची सलामी
भारतीय हवाई दलातील आघाडीचे लढाऊ विमान असलेल्या सुखोईने (सु 30 एमकेआय) कमी उंचीवरून उड्डाण करत संचलनाला सलामी दिली. त्यापूर्वी सुपर डिमोना विमानाने उड्डाण केले.

 

Web Title: Nations and devotion tune "sukhoi opening