‘कॅनव्हास’वर अवतरला निसर्ग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

पुणे - परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक घरांत आत्तापासूनच सुट्यांचे नियोजन सुरू झाले आहे. निसर्गाच्या सानिध्यात जायला, तिथे फिरायला नको कोणीच म्हणणार नाही; पण त्याआधी कोकणापासून केरळपर्यंत किंवा अमेरिकेपासून इटलीपर्यंतचा निसर्ग तिथल्या बारकाव्यांसकट चित्रांमधून अनुभवता येणार आहे. ही चित्र रेखाटली आहेत पुण्यातील चित्रकार कालिदास देशपांडे यांनी.

दर्पण कलादालन येथे देशपांडे यांनी जलरंगात रेखाटलेल्या नानाविध चित्रांचे ‘रिफ्लेक्‍शन’ हे प्रदर्शन बुधवारपासून (ता. १ मार्च) सुरू होत आहे. मेंदुशल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त आपटे यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता याचे उद्‌घाटन होईल. घरात एखादा समारंभ असावा, अशीच काहीशी धांदल देशपांडे यांच्या घरात प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी पाहायला मिळाली.

सगळी चित्र एकत्र करून त्यांनी दिवाणखान्यात मांडली होती. एकत्र केलेल्या चित्रांपैकी कुठले चित्र प्रदर्शनासाठी घेऊन जायचे, कुठले चित्र कलादालनात कोठे लावायचे... याची लगबग चालली होती. त्यातून वेळ काढून त्यांनी प्रत्येक चित्रामागची निर्मिती सांगायला सुरवात केली. त्यावर ते भरभरून बोलू लागले. चित्रांबरोबरच शब्दांतून ते ‘स्पॉट’वर घेऊन जात होते. तिथल्या वातावरणाचा ‘फिल’ घडवून आणत होते.

व्यक्तिचित्र हा देशपांडे यांचा आवडता प्रांत. व्यक्तिचित्रासाठी जे बारकावे, तपशील आवश्‍यक असतात ते सर्व घेऊन देशपांडे निसर्गचित्रांकडे वळले आणि ती निसर्गचित्र ‘तिथे गेल्याची अनुभूती’ समोरच्यांना देऊ लागली. अशीच अनेक चित्र दर्पण कलादालनात ठेवली जाणार आहेत. प्रत्येक चित्रात प्रतिबिंबावर भर देण्यात आला आहे. ते सर्व ‘दर्पण’मध्ये सोमवारपर्यंत (ता. ६ मार्च) सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत अनुभवता येणार आहे.

चित्रांतून अनुभवा...
- वाळूत उमटलेली पावले
- जहाजाचा गंजलेला पत्रा
- खिडकीतून घरात आलेली सूर्याची किरणे
- लाटांचा वेग 
- प्रतिबिंबातून व्यक्त झालेली झाडाची सावली 

Web Title: nature on canvas