#NavDurga सणसरची ‘कल्पना’ सातासमुद्रापार

Kalpana-Dhotre
Kalpana-Dhotre

इंदापूर तालुक्‍यातील सणसर येथील कल्पना भीमराव धोत्रे यांनी पतीच्या आजारपणामुळे कापडी पर्स, ज्वेलरी तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आपले घर सावरले. त्यानंतर आपल्याकडील नवकल्पना इतरांपर्यंत पोचविण्यासाठी त्या महिलांना प्रशिक्षण देत आहेत.

लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतरही गृहिणी हा काही शिक्का पुसला नव्हता. पण, पतीच्या आजाराने सारी गणितेच बदलली. नववीपर्यंत शिकलेल्या कल्पना यांनी घर सावरण्यासाठी आपलेच जग बदलले... कापडी पर्स, ज्वेलरी तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. घरात वस्तू तयार होऊ लागल्या आणि त्यातून घरही सावरले... मग तिथे न थांबता त्याच साधनांचा स्वतःला झालेला उपयोग इतरांना समजावून सांगण्यासाठी राज्यभर भ्रमंती सुरू केली... आतापर्यंत तिच्यासारख्या शिकून तयार झालेल्या महिलांची नव्वदी पार झाली आहे. 

सणसर (ता. इंदापूर) येथील कल्पना भीमराव धोत्रे या महिलेची ही कहाणी नव्याने काहीतरी करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महिलांसाठी प्रेरणाच ठरावी. त्यांच्या पतीला दीड वर्षापूर्वी स्वादुपिंडाचा त्रास झाला आणि पतीची अवजड काम करण्याची प्रक्रिया थांबली. मुले शिकत असल्याने व घराचा भार उचलण्यासाठी कल्पना यांनी पदर खोवला आणि काय करावे, याची खूणगाठ बांधली. अवजड कामे आपण करू शकत नाही, याची जाणीव असल्याने जवळच्याच लासुर्णे गावात निर्माण संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध गृहसजावटीच्या वस्तू तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदवले. प्रशिक्षण घेतानाच कौशल्य असल्याने सारे काही शिकून घेतले.

मग स्वतःही काही नव्या कल्पना तयार करीत त्यांनी घरीच कापडी पर्स, ज्वेलरी, कॉपर, कुंदन ज्वेलरी तयार करण्यास सुरवात केली. त्याची विक्री करण्यासही सुरवात केली. पुण्यापासून ते थेट न्यूझीलंडपर्यंतच्या ग्राहकांकडून त्यांच्या वस्तूंची हातोहात विक्री झाली. त्यांना या कामात पतीसह मुलांनीही मदत केली. 

कल्पना यांनी हीच नवकल्पना इतरांपर्यंत पोचली पाहिजे म्हणून प्रशिक्षण देण्याचा मनोदय व्यक्त केला. आता संस्थेमार्फतच त्या पुणे जिल्ह्यासह बीड जिल्ह्यापर्यंतच्या महिलांना प्रशिक्षण देत आहेत. आपल्याकडील नवकल्पनांची शिदोरी नव्याने घर सावरू पाहणाऱ्या महिलांना त्या देतात. त्यांनी आतापर्यंत ९० महिलांना या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण व कौशल्य दिले आहे. तसेच, काळानुसार बदल करीत नव्या कल्पना घेऊन अशा वस्तूंना झळाळी देण्यासाठीही प्रशिक्षित केले आहे.

खरेतर फक्त माझेच घर सावरले पाहिजे, ही माझी सुरवातीची अपेक्षा होती. मात्र, एका वर्षात लाखमोलाच्या वस्तू विकल्यानंतर, जे आपल्याकडे ज्ञान आहे, ते दुसरे कोणी तसेच स्वीकारू शकत नाही. म्हणूनच मी जसे माझे घर सावरले, तसे माझ्यासारख्या इतरही महिलांना करता यावे म्हणून मी बाहेरगावी प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 -  कल्पना धोत्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com