वन्यप्राणी व माणसांमधला संघर्ष मिटवू पाहणारी ऋतुजा

Rutuja Dhamale
Rutuja Dhamale

वन्यप्राण्यांच्या हक्काच्या रानावनांत मनुष्यप्राण्याची घुसखोरी व अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी कार्यरत संस्थांपैकीच एक आहे मुंबईची "वाइल्ड कॉन्झर्वेशन ट्रस्ट'. ऋतुजा ढमाले ही त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांपैकीच एक आहे. 

ऋतुजा म्हणाली, ""सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पर्यावरणशास्त्रात मी एमएस्सी केलं. त्या दरम्यान विविध प्रकल्पांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामाची संधी मिळाली. नंतर काही संस्थांबरोबर कामाचा अनुभव घेतला तेव्हा वन्यप्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्यातल्या वाढत चाललेल्या संघर्षाची तीव्रता लक्षात आली. केरळ व तमिळनाडू या राज्यांच्या सीमेवरील भागात जमीन कसण्याबाबत काय आणि कसे बदल होत गेले आहेत, याचा अभ्यास करायला मिळाला. बंगळूरच्या प्रा. अबिवनक यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना महाराष्ट्रातील गवताळ प्रदेशात कोल्हे, लांडगे, तरस व खोकर आदी प्राण्यांचा वावर आणि त्याचे परिणाम समजून घेता आले. मध्यंतरी सिक्कीममधील अनुभव घेतला. 

कॉमनवेल्थच्या शिष्यवृत्तीवर वर्षभर केंट युनिव्हर्सिटीत अभ्यास केला. भारतात परतल्यावर बंगळूरच्या दक्षिण फाउंडेशनसाठी दोन वर्षं वन्यप्राणी व मानवजातीदरम्यानच्या कलहाबद्दल जास्त समजू शकलं. आठ महिन्यांपासून वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्टबरोबर मी सध्याचं काम करते आहे.'' 

उमद्या व्यक्तिमत्त्वाची ऋतुजा चंद्रपूर व ब्रह्मपुरीलगतच्या जंगलातील झाडांवर स्वतः कॅमेरे लावून परिसरातील वन्यप्राण्यांच्या दिनचर्ये व वर्तणुकीची निरीक्षणं टिपते. जवळपासच्या वाड्या- वस्त्यांमधील रहिवाशांना आपलंसं करून त्यांचं म्हणणं मनापासून ऐकते. वन्यप्राण्यांमुळे त्यांना होणारा त्रास जसा जाणून घेते, त्याचप्रमाणे माणसांच्या कुठल्या प्रकारच्या वागण्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, हे त्यांच्या गळी उतरवते. हे करताना जंगलात पिढ्यान्‌पिढ्या राहणाऱ्या मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासींकडे दूरवरचे वास ओळखण्याची क्षमता तिला थक्क करते. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमीळ, कानडी, नेपाळी आदी भाषांच्या जोडीला ती आताच्या कामासाठी गावकऱ्यांकडून गोंडीही शिकते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com