आदिशक्तीच्या स्वागतास नटली बाजारपेठ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

दांडियाचे विविध प्रकार
कपड्यांबरोबरच विविध प्रकारच्या दांडियाही विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्या किमती शंभर ते पाचशे रुपयांदरम्यान आहेत. लाकडाच्या, स्टीलच्या, लाइटवेट असे त्यात प्रकार आहेत. लहान मुलांसाठीही वेगळ्या दांडिया उपलब्ध असून, गडद रंगाच्या दांडियांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पिंपरी - अवघ्या दहा दिवसांवर नवरात्रोत्सव आला असून, शहरातील बाजारपेठा या उत्सवासाठी सज्ज झाल्या आहेत. तरुणतरुणींचे आकर्षण असलेल्या दांडिया व त्याच्याशी निगडित वस्त्रप्रावरणांचे असंख्य प्रकार दाखल झाले आहेत. महिलांसाठी घागरा ओढणी, बंजारा ड्रेस, चनिया चोली, तर युवकांसाठी काठेवाडी, लॉकेट यांची मोठी रेलचेल आहे. 

घागरा प्रकारात एम्ब्रॉयडरीला मोठी मागणी आहे. हे सर्व प्रकारचे ड्रेस जबलपूर, राजकोट, इंदूर, अहमदाबाद, राजस्थान या ठिकाणांहून मागविण्यात आले आहेत. सध्या सिथेंटिकमध्येही घागरा चोली उपलब्ध असून, त्याच्या किमती बाराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच, सीझनेबल स्टॉलमुळे गरब्याच्या कपड्यांच्या विक्रीमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ झाली असल्याचे पिंपरीतील कापड व्यापारी के. जी. चंदानिया यांनी सांगितले. 

चिनी वर्क साहित्य 
घागरा ओढणी, चनिया चोलीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यात चीनने प्रवेश केला आहे. पूर्वी गरबासाठी घातल्या जाणाऱ्या कपड्यांना काचेचे आरसे लावले जात असत. नंतर प्लॅस्टिकच्या बटणांचा समावेश करण्यात आला. आता हे सर्व प्रकार मागे पडले असून, चिनी पेपर टिकलीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. हे घागरे साडेपाचशेपासून ते नऊशे रुपयांपर्यंत मिळत आहेत. तरुणाईची त्याला मोठी पसंती मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratrotsav Celebration Market