तिन्ही नराधमांना फाशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

पुणे - वासनेचा बळी ठरलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी यांना अखेर न्याय मिळाला. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि त्यांचा निर्घृण खून करणाऱ्या तीन जणांना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी मरेपर्यंत फाशी देण्याचा आदेश दिला. हा निर्णय जाहीर होताच न्यायालयाच्या कक्षेत असलेल्यांनी टाळ्या वाजविल्या, तर माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा होणे आवश्‍यक असल्याचे मत पुजारी यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले.

योगेश अशोक राऊत (वय 24, रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 24, रा. सोळू, खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय 26, रा. दिघी, मूळ रा. सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या गुन्ह्यातील आरोपी राजेश पांडुरंग चौधरी हा माफीचा साक्षीदार झाल्याने त्याला दोषमुक्त केले गेले. सोमवारी या आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षेवर मंगळवारी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि आरोपींतर्फे बी. ए. अलूर यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद आणि निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या कक्षात तुडुंब गर्दी झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
ऑक्‍टोबर 2009 मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती.

विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. विविध स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा, निवेदने देऊन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. या पार्श्‍वभूमीवर या खटल्याच्या सुनावणीला महत्त्व आले होते. सोमवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यास विलंब झाल्याने न्यायालयाने येरवडा कारागृह अधीक्षकांना नोटीस बजाविली होती. मंगळवारी मात्र, वेळेपूर्वीच आरोपींना न्यायालयात हजर केले गेले. न्यायाधीश येनकर यांनी आरोपींना शिक्षेबाबत काही सांगायचे आहे का, असे विचारले. आरोपी राऊतने हा गुन्हा राजेश चौधरीनेच केल्याचा आरोप करीत त्यालाही शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. मला पत्नी आणि मुलगी असून, त्यांच्या भविष्याचा विचार करून दया दाखवून कमी शिक्षा द्यावी, असे नमूद करताना राऊतच्या डोळ्यांत पाणी आले. ठाकूर याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही, तर कदमने चौधरीला शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवादाला सुरवात करीत आरोपींनी केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा दावा केला. बच्चनसिंग विरुद्ध पंजाब सरकार, मच्छीसिंग विरुद्ध पंजाब सरकार, धनंजय चॅटर्जी विरुद्ध पश्‍चिम बंगाल सरकार, पुरुषोत्तम बोराटे विरुद्ध महाराष्ट्र सरकार, शंकर खाडे विरुद्ध महाराष्ट्र सरकार आदी खटल्यांचा दाखला निंबाळकर यांनी दिला. निर्घृण खून केलेल्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा देताना न्यायालयाने कोणत्या गोष्टी, निकषांचा विचार करणे आवश्‍यक आहे, हे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

या प्रकारच्या गुन्ह्यात निर्णय देताना आरोपीचे वय खूप कमी आणि खूप जास्त असल्यास, आरोपीचे वर्तन सुधारण्याची शक्‍यता असल्यास, आरोपी हा सराईत गुन्हेगार नसल्यास, त्याला हा गुन्हा करण्यासाठी कोणीतरी भाग पाडलेले असल्यास, तो मानसिक रुग्ण असल्यास अशा मुद्यांचा विचार करूनच आरोपीला कमी शिक्षा दिली जाऊ शकते; पण या आरोपींनी केलेले कृत्य आणि हे आरोपी या निकषात बसत नाहीत, असा युक्तिवाद निंबाळकर यांनी केला.

गुन्ह्याची हकिगत सांगून निंबाळकर यांनी हा गुन्हा अमानवी असल्याचा दावा केला. नयना पुजारी आरोपींवर विश्‍वास ठेवून त्यांच्या मोटारीत बसल्या होत्या. त्यांच्या असहायतेचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. पुजारी या आरोपींकडे याचना करीत होत्या, सोडून देण्याची मागणी करीत होत्या; परंतु आरोपींना दया आली नाही. त्यांनी लैंगिक छळ करीत राक्षसी आनंद घेतला. त्यांच्या या कृत्यामुळे "आयटी'मध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हा गुन्हा उघड होऊ नये म्हणून त्यांनी पुजारी यांचा खून केला. आयटी क्षेत्रात महिला रात्रपाळीत काम करतात, त्यांच्या आत्मविश्‍वासाला धक्का बसला, केवळ पुजारीच नाही, तर काम करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या कुटुंबीयांमध्ये भीती निर्माण करणारा हा
गुन्हा आहे. हा गुन्हा निर्भया आणि ज्योतीकुमारी या प्रकरणापेक्षा गंभीर आहे. आरोपी हे वासनांध असून, त्यांच्या गुन्ह्याला केवळ फाशी हीच शिक्षा देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांना जरब बसू शकेल, असा दावा निंबाळकर यांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानत आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली.

Web Title: nayana pujari case accused hanging punishment