अभिजीत पुजारींच्या लढ्याला यश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

अशा प्रकारच्या खटल्यांची सुनावणी लवकर होऊन निकाल लागला आणि कठोर शिक्षा झाली, तर असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही. अशा घटना घडतात; परंतु पीडित व्यक्तीच्या घरातील लोकांची काय परिस्थिती होते, हे त्यांनाच माहिती असते.

पुणे - 'नयना माझी प्रेरणा आहे. कधी तरी 'नर्व्हस‘ व्हायला होतं. सगळ्यापासून लांब जावंसं वाटतं. पण मी गेलो, तर नयनाला न्याय कोण मिळवून देणार..., ही भावना उमटते. त्यामुळे पुन्हा न्यायासाठी लढायला उभा राहिलो. असे सांगणारे नयना पुजारी यांचे पती अभिजीत पुजारी यांच्या सात वर्षांच्या लढ्याला यश आले.

दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाने देश खोलवर हादरला असताना पुण्यात अशाच प्रकरणाची शिकार ठरलेल्या नयना पुजारी यांचे अभिजित हे पती. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दोषी ठरविले, ही समाधानाची बाब आहे, त्यांना फाशीच झाली पाहिजे. नयनाला न्याय मिळायला हवा, अशा भावना अभिजित पुजारी आणि नातेवाइकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या बहिणीला अश्रू लपविता येत नव्हते. दोषींना शिक्षा झाल्याने आज या सर्वांच्या लढ्याला यश आले आहे.

अशा प्रकारच्या खटल्यांची सुनावणी लवकर होऊन निकाल लागला आणि कठोर शिक्षा झाली, तर असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही. अशा घटना घडतात; परंतु पीडित व्यक्तीच्या घरातील लोकांची काय परिस्थिती होते, हे त्यांनाच माहिती असते. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात आणि माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहरात ही घटना घडली होती, असे अभिजीत यांनी सोमवारी म्हटले होते.

पाच कलमी अजेंडा 
अभिजित यांना पाच ठोस बदल हवेत. ते असे : 

  • महिलांच्या असुरक्षिततेच्या मुद्द्यांवर जी चर्चा, निर्णय होतात; त्यांची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी. 
  • तपासात पोलिसांकडून नकळत त्रुटी राहतात. परिणामी, गुन्हेगार सुटतात. त्यामुळे महिलांसंदर्भातील अत्याचाराच्या घटनांचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांचे मार्गदर्शनही हवे. 
  • पोलिसांना सक्षम सुविधा पुरवायला हव्यात. वेगाने तपास करण्यासाठी पोलिसांना सक्षम करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. 
  • सहा महिन्यांच्या आत गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी. 
  • समाज म्हणून अशा घटनांबद्दल सजग राहायला हवे; तरच प्रशासनावर आणि सरकारवर वचक बसेल. घटना रोखता येतील आणि न्याय मिळेल. 
Web Title: Nayana Pujari rape murder case, Abhijeet pujari statement