'नायडू'मध्ये अतिदक्षता विभाग सुरू करा

Sasoon-Hospital
Sasoon-Hospital

पुणे - ससून रुग्णालयातील इतर रुग्णांना "एच1एन1' विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी तातडीने अतिदक्षता विभागाची व्यवस्था करावी, असे पत्र बुधवारी ससून रुग्णालयाने महापालिकेला पाठविले.

राज्याच्या वेगवेगळ्या भागातून विविध प्रकारचे रुग्ण ससून रुग्णालयात उपचारांसाठी येतात. त्यात आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांचीही संख्या सातत्याने वाढत आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या इतर रुग्णांनाही या विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावे, असे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविल्याची माहिती ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी दिली.

डॉ. तावरे म्हणाले, 'महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केल्यास एकाच रुग्णालयात त्यांना सेवा देता येईल. तसेच, ससून रुग्णालयातील इतर रुग्णांचीही वैद्यकीय सेवा सुरळीतपणे सुरू राहील. त्यामुळे या पत्राची दखल घेऊन महापालिकेने तातडीने स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष सुरू करावा.''

'स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना इतर रुग्णांपासून वेगळे करणे आवश्‍यक असते. त्यामुळे डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करणे ही आता काळाची गरज आहे. त्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय तज्ज्ञ ससून रुग्णालयातून उपलब्ध केले जातील,''
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

'डॉ. नायडू किंवा कमला नेहरू रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग उभारत असताना उपकरणांपेक्षाही त्यासाठी विशेषज्ज्ञ डॉक्‍टर ही मोठी समस्या आहे. ससूनसह इतर वैद्यकीय संस्थांच्या मदतीने ही समस्या सुटणार असेल तर, त्याचा प्राधान्याने विचार करण्यात येईल.''
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

दृष्टिक्षेपात पुण्यातील स्वाइन फ्लू
- तपासणी केलेले रुग्ण - 7 लाख
- स्वाइन फ्लूचे औषध दिलेले रुग्ण - 10 हजार 400
- स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेले रुग्ण - 284
- रुग्णालयात दाखल स्वाइन फ्लूचे रुग्ण - 129
- व्हेंटिलेटरवरील स्वाइन फ्लूचे रुग्ण - 51
- उपचार करून घरी सोडलेले रुग्ण - 103
- मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - 20

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com