राष्ट्रवादीचा आरोप हास्यास्पद - गोगावले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पुणे - भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जाहीरनामा "कॉपी' केला, हा आरोप हास्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत केले. भाजपचा प्रारूप जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

पुणे - भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जाहीरनामा "कॉपी' केला, हा आरोप हास्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत केले. भाजपचा प्रारूप जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी "राष्ट्रवादीचा जाहीरनामा भाजपने कॉपी केला,' असा आरोप शनिवारी केला होता. त्याचे खंडन करताना गोगावले म्हणाले, ""भारतीय जनता पक्षाने 26 डिसेंबर रोजी शहराचा प्रारूप जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामुळे कोणी कोणाचा जाहीरनामा कॉपी केला, हे पुणेकरच आता ठरवतील. भाजपच्याच प्रारूप जाहीरनाम्यातील अनेक संकल्पना राष्ट्रवादीने जशाच्या तशा उचलल्या आहेत, हे त्यातून दिसून येते. तरीही भाजपवर आरोप केल्याबद्दल आश्‍चर्य वाटते.'' 

भाजपने प्रारूप जाहीरनामा प्रसिद्ध केल्यावर त्यावर तब्बल 20 हजार पुणेकरांनी सूचना केल्या. त्यांचा अंतर्भाव करून शहराचा अंतिम जाहीरनामा भाजपने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले. प्रत्येक प्रभागात योग भवन, छोटी नाट्यगृहे आणि कलादालने, महिलांसाठी पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे, शहरात जलशिवार योजना, 24 तास पाणीपुरवठा आदी अनेक नावीन्यपूर्ण योजना भाजपनेच मांडल्या असल्याचा पुनरुच्चार गोगावले यांनी केला. राष्ट्रवादीने त्यांच्या जाहीरनाम्यात 10 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे; परंतु महापालिकेच्या माध्यमातून ते नोकऱ्या कशा देणार, याचा आराखडा जाहीर करावा, असे आवाहन गोगावले यांनी केले. तसेच 2007 ते 2015 दरम्यान राष्ट्रवादीने शहराचा काय विकास केला, याचा लेखाजोखा त्यांनी मतदारांसमोर मांडावा, असेही ते म्हणाले. 

ऍमेनिटी स्पेसबाबत राष्ट्रवादी-कॉंग्रेस उदासीन 
शहरात 1997 ते 2014 दरम्यान 731 ऍमेनिटी स्पेस महापालिकेच्या ताब्यात आल्या; परंतु त्यातील एकाही जागेवर शहराच्या हिताचा प्रकल्प राष्ट्रवादी-कॉंग्रेसला करता आला नाही. त्यामुळे या जागांवर पाण्याचा पुनर्वापर, कचऱ्याचे व्यवस्थापन आदी प्रकल्प राबविण्याचे भाजपने ठरविले आहे. तसेच या जागा बळकावण्याऐवजी शहरहिताच्या प्रकल्पांसाठी वापरण्याचा आराखडा भाजपने तयार केला आहे, असेही गोगावले यांनी पत्रकार परिषदेत निदर्शनास आणले. 

Web Title: NCP allegations ridiculous