राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीच्या उंबरठ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

कॉंग्रेसमधील काहींचा विरोध 
कॉंग्रेसमधील नाराज आजी-माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात हालचाली सुरू आहेत. त्यातच कॉंग्रेसचे माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी "राष्ट्रवादी'त प्रवेश केला आहे. आपल्या पक्षातील नगरसेवकांना राष्ट्रवादी फोडत असल्याचे गाऱ्हाणे मांडत कॉंग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी आघाडीला विरोध केला आहे. त्यामुळेच आघाडीत अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने मागणी केलेल्या जादा जागांपैकी काही जागांची मागणी मान्य करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीबाबत आपण सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. त्याबरोबरच एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याच्या अगदी जवळ आल्याचेच मानले जात आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या मनगटातील बळ वाढत असल्याने "आघाडी'च्या शक्‍यतेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस गंभीरपणे विचार करीत आहे. कॉंग्रेसने 71 जागांची मागणी केली असता, राष्ट्रवादीने 46 जागा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र आणखी दहा जागा वाढवण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बुधवारी अंतिम चर्चा होईल. कॉंग्रेसला 46 ऐवजी आता 58 जागा देण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव असल्याने आघाडीबाबत औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्व पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने स्वबळापेक्षा एकत्रित निवडणूक लढण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरू केली आहे. जागावाटप आणि अन्य मुद्यांबाबत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्याही झाल्या आहेत. त्यानुसार कॉंग्रेसला 46 जागा देऊन, उर्वरित 116 आपल्या ताब्यात ठेवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न होता. त्यावर नाराजी व्यक्त करीत, आणखी जागा पदरात पाडून घेण्याचा कॉंग्रेसचा आग्रह आहे. मात्र, दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने आघाडीची चर्चा पुढे सरकत नाही. विरोधकांना रोखण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याची भूमिका सातत्याने मांडत राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसला जागा वाढवून देण्याचा मनस्थितीत आहे. नव्या रचनेतील त्या त्या प्रभागांमधील आपली ताकद लक्षात घेऊन, नेमक्‍या कोणत्या जागा सोयीच्या आहेत, याचा आढावा घेत कॉंग्रेसबरोबरच पुन्हा चर्चेची तयारी "राष्ट्रवादी'चे नेते अजित पवार यांनी दाखविल्याचे समजते. या संदर्भात शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी पवार यांनी सोमवारी चर्चा केली. कॉंग्रेसबरोबर सकारात्मक चर्चा करण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. 

समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याची भूमिका आहे. त्याबाबत कॉंग्रेसबरोबर चर्चा सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये आमची ताकद आहे, ते आमच्याकडे ठेवले जातील. कॉंग्रेसला सन्मानाने योग्य तेवढ्या जागा देऊ. त्यावर बैठकीत चर्चा होईल, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ""राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार पक्षाच्या स्तरावर आम्ही चर्चा करीत आहे. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा करू.'' 

कॉंग्रेसमधील काहींचा विरोध 
कॉंग्रेसमधील नाराज आजी-माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात हालचाली सुरू आहेत. त्यातच कॉंग्रेसचे माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी "राष्ट्रवादी'त प्रवेश केला आहे. आपल्या पक्षातील नगरसेवकांना राष्ट्रवादी फोडत असल्याचे गाऱ्हाणे मांडत कॉंग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी आघाडीला विरोध केला आहे. त्यामुळेच आघाडीत अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: NCP alliance that gave a positive signal