राष्ट्रवादीच्या विसर्जनाची सुरवात बारामतीपासून करा - चंद्रशेखऱ बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bawankule

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामतीतूनच विसर्जन केले तर राज्यातून या पक्षाचे विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही.

राष्ट्रवादीच्या विसर्जनाची सुरवात बारामतीपासून करा - चंद्रशेखऱ बावनकुळे

बारामती - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामतीतूनच विसर्जन केले तर राज्यातून या पक्षाचे विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा संदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बारामतीत भाजप कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मोठी सभा बारामतीत घेणार असल्याची घोषणा देखील बावनकुळे यांनी यावेळी केली.

आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही बारामतीत लक्ष घालणार असून त्यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मंत्रीस्तरावर या मतदारसंघाची जबाबदारी द्यावी अशी सूचना मी करणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

पुणे जिल्हा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मंगळवारी (ता. 6) बारामतीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, गोपीचंद पडळकर, बारामतीचे प्रभारी राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, गणेश भेगडे, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, जालिंदर कामठे, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, शरद बुट्टे पाटील, कांचन कुल, प्रदीप कंद, आशा बुचके यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, केवळ आपल्या मतदारसंघाचीच नाही तर देशाच्या भविष्याची लढाई आपल्याला लढायची आहे आणि त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन मन परिवर्तन करून त्या माध्यमातून मत परिवर्तन करायचे आहे. अजित पवार यांच्या काटेवाडीचे कार्यकर्ते आज इमानदारीने काम करण्याचा संकल्प करतात, याचाच अर्थ बारामतीत आगामी काळात निश्चित परिवर्तन होणार आहे.

केवळ लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपूरती ही रणनीती आखायची नसून तर भाजप हा असली शिवसेनेसोबत युती करून स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीचे विरोधात लढला पाहिजे, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

सरकार बदलल्यानंतर देखील पुणे जिल्ह्यामध्ये परिवर्तन झाले आहे असे जाणवत नाही अशा असंख्य तक्रारी आपल्याकडे आल्या असून आपण याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत प्रशासकीय स्तरावर सुधारणा करण्याबाबत सूचना करणार असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले. या मतदारसंघाच्या विजयासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हर्षवर्धन पाटील यांनी देखील आता यापुढील काळात फाट्या आखूनच राजकारण केले पाहिजे असे नमूद केले. भीमराव तापकीर यांनीही खडकवासला मतदारसंघातून 65 हजाराच्या वर मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या पुढील काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी न घाबरता काम करावे असे सांगत बारामतीत आता पवार कुटुंबीयांना सक्तीची विश्रांती द्यायला हवी, त्यांनी आजपर्यंत या मतदारसंघाची खूप सेवा केली, आता त्यांना आराम करायला पाठवावे.