‘राज्य पाण्यात असताना विकासाचा डिंडोरा’ - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सत्ता द्या; चौकशी करतो...
काही जण जमीन बळकावत आहेत, त्यांची चौकशी करा, अशी मागणी एका कार्यकर्त्याने पवार यांचे भाषण सुरू असताना केली. तेव्हा ‘सत्ता द्या; मी चौकशी करतो’ असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नांना मिश्‍किलपणे उत्तरे दिली.

पुणे - महाराष्ट्र पाण्यात असताना सत्ताधारी मात्र, यात्रा काढून विकास केल्याचा डिंडोरा पिटत होते, असा आरोप करतानाच गेल्या पाच वर्षांत काय केले, अशी विचारणा करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पुण्यालगतची धरणे भरूनही पुणेकरांना प्यायला पुरेसे पाणी नाही. मी पालकमंत्री असताना पुणेकरांना कधीच पाणी कमी पडू दिले नाही, हेही पवार यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पवार यांनी रविवारी शहरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, सचिव सुबानअली शेख, खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी- नगरसेवक उपस्थित होते. 

निवडणुकीसाठी पक्षाची यंत्रणा, तिकीट वाटपाचे टप्पे सांगतानाच पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. पालकमंत्र्यांचा धाक असायला हवा, तो आता कुठंय, असा प्रश्‍न विचारत पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. पवार म्हणाले, ‘‘भाजप सरकारने राज्याला कर्जबाजारी केले असून, गेल्या पाच वर्षांत अडीच लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. त्याआधीच्या ५४ वर्षांत इतके कर्ज होते. मात्र सरकारने पाच वर्षांतच एवढे केले. सरकारला सर्वच पातळ्यांवर अपयश आले आहे. निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्याकडे मुद्दे राहिले नाहीत.’’

पुण्यातील भाजपचे आमदार का बोलत नाहीत, पुणे कॅंटोन्मेंटच्या आमदाराचे मंत्रिपद का गेले, असे सवाल करीत पवार यांनी भाजपच्या आमदारांवर निष्क्रियेतचा ठपका ठेवला. ‘‘काश्‍मीरमधील माजी लोकप्रतिधिनींना घराबाहेर पडता येत नाही. ही परिस्थिती चिंताजनक आहे,’’ असे सांगून पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर बोट ठेवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Campaign Ajit Pawar Talking on Water Issue