Loksabha 2019 : उदयनराजेंमुळेच शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' : डॉ. कोल्हे 

Amol Kolhe
Amol Kolhe

राजगुरुनगर : मला छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात साताऱ्यातून लढण्यासाठी शिवसेनेने विचारले होते. त्यांना मी शिवछत्रपतींच्या गादीशी बेइमानी होणार नाही, असे सांगून नकार दिला, असा गौप्यस्फोट शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राजगुरुनगर येथे केला. आपल्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. 

या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील, देवदत्त निकम, बाळशेठ ठाकूर, प्रदीप गारटकर, राम कांडगे, प्राजक्ता गायकवाड, शंतनू मोघे, लतिका सावंत, कैलास सांडभोर, देवेंद्र बुट्टे, अनिल राक्षे, समीर थिगळे, विजय डोळस, एस. पी. देशमुख, हिरामण सातकर, जे. पी. परदेशी, नीलेश कड, जमीर काझी उपस्थित होते. 

कोल्हे म्हणाले, "आज शिवसेनेवाले मला अभिनेता लोकनेता कसा होणार, म्हणून हिणवत आहेत. त्यांनीच मला साताऱ्यातून लढण्याविषयी विचारले होते. तुमच्या आशीर्वादाने लोकसभेत गेल्यावर तेथे तरुणांचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा, बैलगाडामालकांचा, मावळ्यांचा आवाज घुमेल. या भूमीला अभिमान वाटेल असे काम करून दाखवीन.''

अजित पवार म्हणाले, ""भाजपच्या काळात झालेली नोटाबंदी मोठा भ्रष्टाचार आहे. यांच्या काळात कारखाने आले नाहीतच, उलट कॉंग्रेसच्या काळात उभे राहिलेले उद्योग बंद पडले. जेट एअरवेज, व्हिडिओकॉन, बीएसएनएल, एमटीएनएल इत्यादी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. रोजगार मिळाले नाहीतच, उलट नोकऱ्या जात आहेत. पंतप्रधान मोदी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवितात. गांधी, नेहरू आणि पवार घराण्यावर टीका करतात. भाजपावाले शिवसेनेबरोबर पंचवीस वर्षे सडली म्हणत होते. आता मोदी म्हणतात उद्धव ठाकरे माझा लहान भाऊ आहे. उद्धव ठाकरे शेतमालाला आधारभूत किंमत दिली नाही तर पाठिंबा काढू म्हणत होते. मंत्र्यांचे राजीनामे देऊ, असे सांगत होते. त्या राजीनाम्यांचे पार वाटोळे झाले. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे. म्हणून जातीयवादी पक्षांचा बीमोड करण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या 
आघाडीलाच मते द्या.'' 

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : अजित पवार 
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्याधीशांच्या विरोधात आरोप केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. भारताच्या इतिहासात कधीही असे झाले नव्हते. पुलवामाला जवान शहीद झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याऐवजी लोकांना भावनिक बनवून मते मागत आहेत. वर्षाला साडेतीन ते चार हजार शेतकरी आत्महत्या होत आहेत. यांच्या काळात एकही धरण झाले नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका पवार यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com