
शरद पवार झाले कसब्यात सक्रीय
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. आज सायंकाळी त्यांनी कसब्यात अल्पसंख्याकांच्या मेळाव्याला संबोधित केलं.
कसब्यातले महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी त्यांनी गंज पेठेत हा मेळावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "पुणे शहर एकता ठेवणार शहर आहे. अल्पसंख्याक समुदाय काँग्रेस,राष्ट्रवादी,समाजवादी सोबत कायमच राहिला आहे. देशात भाजपची सत्ता आहे,अनेक पक्षाची सत्ता अगोदर देशात होती,पण मोदी यांच्या सहकाऱ्यांच्या डोक्यात आहे सर्व देशात ताब्यात हवा.याचा सगळयात जास्त फटका अल्पसंख्याक समाजाला बसत आहे." (NCP Chief Sharad Pawar Active in Kasba Bi Election)
" दिल्ली महापालिकेत केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या पक्षाला बहुमत आहे. भाजपच्या विरोधामुळे महापौर पदासाठीची निवडणूक तीन वेळा रद्द करावी लागली.अखेर न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक झाली आणि त्यात भाजपचा पराभव झाला.यातून हेच दिसतं की ज्यांच्या हातात सत्ता आहे ते विरोधी पक्षांना काम करु देणार नाहीत," अशी टीका पवार यांनी यावेळी केली.
देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जातोय असं सांगून पवार म्हणाले," भाजप कडून राजकीय पक्षांना त्रास देण्याचं काम सुरू आहे.निवडणूक आयोगाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण आपण बघितलं. शिवसेनेला दुसऱ्याच्या हाती देऊन टाकले. ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली त्यांच्या ऐवजी दुसऱ्यांना शिवसेनेचे चिन्ह आणि नाव दिलं,"
"शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सुरू केली,त्यांनी सहकाऱ्यांना सागितले की माझ्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील. पण निवडणूक आयोगाने शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्याच्या हातात दिली नाही," असंही पवार म्हणाले. आता आपल्या सगळ्या लोकांना एकत्र यावं लागेल.
कसब्याची निवडणुक खूप महत्वाची आहे. समाजात भाईचारा एकोपा कसं ठेवायचा ते रवींद्रकडे बघून कळते. कुणी काहीही अफवा पसरवेल पण त्याच्याकडे लक्ष देऊ नका निवडणुकीवर लक्ष द्या, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.