Loksabha 2019 : शरद पवारांनी मोडली बारामतीत प्रचाराची परंपरा

रमेश वत्रे
रविवार, 7 एप्रिल 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या बैठकांमधून पवार कार्यकर्त्यांना बळ देत व भाजपवर हल्लाबोल करतील अशी शक्यता आहे. पवार हे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांचा निवडणूक काळात राज्यभर व्यापक दौरा असतो.

केडगाव ( पुणे ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यंदा आपला नेहमीचा शिरस्ता मोडून दौंड तालुक्यात चार ठिकाणी आज (रविवारी) कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या प्रचारात गुंतल्याने शरद पवार यांनी स्वतः बारामती लोकसभा निवडणुकीत लक्ष घातल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या बैठकांमधून पवार कार्यकर्त्यांना बळ देत व भाजपवर हल्लाबोल करतील अशी शक्यता आहे. पवार हे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांचा निवडणूक काळात राज्यभर व्यापक दौरा असतो. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणूक असो की विधानसभा ते राज्याचा दौरा करून फक्त सांगता सभेला येतात. अशा सांगता सभेची मोठया क्रिडांगणावर जंगी तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाते. अशा सांगता सभेत एक मोलाचा आणि खोचक संदेश देत पवार यांनी निवडणुकीचे चित्र बदलले आहे.

बारामती मतदार संघ हा राष्ट्रवादीसाठी होम पीच असल्याने पक्षाने आतापर्यंत काळजी केली नव्हती. मात्र यावेळी प्रथमच शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. आतापर्यंत पवार यांनी प्रचाराचा शेवटचा दिवस पुरंदर, दौंड, इंदापूर आणि बारामती येथील सांगता सभांसाठी राखून ठेवलेला असायचा. या लोकसभा निवडणुकीतही तसे नियोजन असेल. मात्र निवडणुकीच्या 17 दिवस अगोदर अशा बैठका होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

Web Title: NCP chief Sharad Pawar campaign in Baramati for Loksabha election