शरद पवारांच्या गुगलीने हर्षवर्धन आणि भरणे दोघेही गॅसवर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडावी ही कॉंग्रेसची मागणी कायम आहे. लोकसभा निवडणुकीपासून यावर दोन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर इंदापूरबाबत विचारले असता पवार यांनी वरील उत्तर दिले.

पुणे : विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षाकडेच राहाव्यात हे दोन्ही काँग्रेसमधील आघाडीतील जागावाटपाचे सूत्र राहणार असले तरी अपवाद म्हणून एखाद्या-दुसऱ्या जागेबाबत फेरविचार होऊ शकतो, असे विधान करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाचवेळी इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना दिलासा देत कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पवार यांच्या विधानामुळे प्रत्यक्ष जागावाटप होईपर्यंत दोघेही बुचकळ्यात राहणार आहेत.

इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडावी ही कॉंग्रेसची मागणी कायम आहे. लोकसभा निवडणुकीपासून यावर दोन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर इंदापूरबाबत विचारले असता पवार यांनी वरील उत्तर दिले.

ते म्हणाले, ``ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे त्याचपक्षाकडे ती जागा कायम राहते, असे आघाडीतील जागा वाटपाचे सर्वसाधारण सूत्र असते. मात्र, अपवाद म्हणून एखाद्या-दुसऱ्या जागेबाबत तडजोड होऊ शकते.`` मात्र याबाबत अधिक स्पष्ट न बोलता त्यांनी सध्या तरी इंदापूरातील दोन्ही नेत्यांना गॅसवर ठेवले आहे. 

राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर विद्यमान आमदार भरणे हे भारतीय जनता पार्टीची वाट धरणार आणि कॉंग्रेससाठी इंदापूरची जागा सोडली नाही तर हर्षवर्धन पाटील भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवणार या दोन शक्‍यतांची चर्चा माध्यमांमधून गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी केलेल्या विधानाला विशेष महत्व आहे. 

माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हे भाजपात प्रवेश करणार नाहीत. त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून ते आजच मला भेटायला येत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पक्ष प्रवेशाच्या काही बातम्यांमध्ये तथ्य असले तरी काहीजणांच्या बाबत मुद्दाम वावड्या उठवल्या जात असल्याचे पवार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar statement on Indapur assembly seat