Budget Session 2023 : अर्थसंकल्पातून गतीमान विकास भाजपकडून स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget Session 2023

Budget Session 2023 : अर्थसंकल्पातून गतीमान विकास भाजपकडून स्वागत

पुणे : शिंदे फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी याचे स्वागत करत शाश्‍वत, गतीमान विकासाबरोबर सर्व समाजघटकांचे हित साधणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले आहे.

तर विरोधकांनी पुण्याला या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही, केवळ भरीव तरतूद उपलब्ध केली जाईल असे आश्‍वासन दिले. त्यामुळे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पातील पंचामृतातून पुण्याच्या विकासासाठी एकही थेंब मिळालेला नाही अशी टीका केली आहे.

सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) विभागीय कार्यालय नाशिक येथे उभारण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची भरीव तरतुद केली आहे.

- चंद्रकांत पाटील, उच्चशिक्षण तंत्र शिक्षण मंत्री

पुण्याच्या शाश्‍वत व गतीमान विकासाबरोबर शहराचे सांस्कृतिक वैभव जपणारा आणि सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक प्रगती करणारा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस मांडला. गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या विकासाला चालना मिळणार असून, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, इतरमागासवर्गीय, मागासवर्गीय, अल्पसं‘यांक, व्यापारी यांचा हित साधणारा अर्थसंकल्प आहे.

- माधुरी मिसाळ, आमदार

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काहीच आलेले नाही. पुरंदर विमानतळ, स्वारगेट- कात्रज मेट्रोसाठी काहीच तरतूद नाही. महाविकास आघाडी सरकारने हडपसर ते लोणीकाळभोरचा प्रस्ताव तयार केला, त्याबद्दल एक अक्षरही अर्थसंकल्पात नाही. रिंगरोडसाठी २७ हजार कोटी आवश्‍यक असताना केवळ १ हजार कोटी तरतूद केली, ती अपुरी आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या अर्थसंकल्पातील पंचामृताचा एक थेंबही पुणेकरांच्या हातावर पडलेला नाही.

चेतन तुपे, आमादर

मुंबईनंतर सर्वाधिक महसूल पुण्यातून मिळतो. पण अर्थसंकल्पात पुण्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पुरंदर विमानतळ, रिंग रोड, मेट्रोसाठी पुरेशा निधीची तरतूद न करता केवळ वाटण्याच्या अक्षता दाखविन्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. हा पुणेकरावर अन्याय आहे.

- सुनील टिंगरे, आमदार

राज्य सरकारने पुणेकरांना गृहीत धरत, त्यांना ठेंगा दाखविण्याचे काम या अर्थसंकल्पात केले आहे. पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा विचार करून बंडखोर आमदारांच्या सोईने तरतुदी केल्या आहेत.

- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

‘‘महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ठप्प झालेल्या पुण्याच्या विकासाला गती देणारा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे रिंगरोड, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक-पुणे रेल्वे या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, सांस्कृतिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत.’’

- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप

पुणे विमानतळ, रिंगरोड यासाठी किती निधी दिला हे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत नाही, मेट्रो विस्तारही रखडलेला आहे. आम आदमी पक्षाच्या महोल्ला क्लिनिकच्या धर्तीवर आपला दवाखाना प्रस्तावित केला आहे पण ठाण्याततील दवाखाने बंद पडले आहेत. फक्त कॉप करून काही होत नाही, त्यासाठी इच्छाशक्ती हवी.

- मुकुंद किर्दत, प्रवक्ता, आप

हा अर्थसंकल्प केवळ निवडणुकीसाठी जाहीर झाला आहे, पण यातून उद्योग धंदेवाढ, रोजगार निर्मिती यासाठी ठोस उपाय योजना नाही. अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची घोषणा २०१४ पासून हवेतच आहे. अर्थसंकल्पात अनेक योजना असली तरी त्याची अंमलबजावणी केली केली जाईल याचे नियोजन नाही.’’

- प्रथमेश आबनावे, सरचिटणीस, युवक काँग्रेस

टॅग्स :Pune NewsBudget