निष्क्रिय विद्यमान नगरसेवकांचा 'पत्ता कट' होणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

पुणे : महापालिका निवडणुकीतील विरोधकांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली असून, अशा परिस्थितीत निवडून येण्याचा निकष लावताना काही विद्यमान नगरसेवकांचा 'पत्ता कट' करण्याचा प्रयत्न पक्षाच्या पातळीवर सुरू आहे, त्यामुळे पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या पक्षाच्या पहिल्या यादीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पक्षात निष्क्रिय राहिलेल्या आणि नव्या प्रभागरचनेत निवडून येण्याची क्षमता नसलेल्या उमेदवारांना महापालिकेच्या आगामी निवडणुकीत तिकिटे नाकारण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. निवडणुकीत चांगले अर्थात, सक्षम उमेदवार देण्याकरिता पक्षाच्या वतीने उमेदवारांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले आहे. त्यानंतर मुलाखतींचाही कार्यक्रम झाला असून, पुढील महिन्याच्या सुरवातीला, म्हणजे सात जानेवारीपर्यंत पक्षाची पहिली अधिकृत यादी जाहीर केली जाणार आहे, त्यामुळे याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. 

महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी भारतीय जनता पक्षासह विरोधकांचे आव्हान असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने निवडणूक जिंकण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यात, प्रामुख्याने तरुण- तरुणींना संधी देण्याचा प्रयत्न पक्ष करीत असून, त्यामुळे आपले अस्तित्व कायम राहण्याची आशा पक्षनेतृत्वाला आहे. त्यातून काही 'निष्क्रिय विद्यमानां'चीही उमेदवारी नाकारली जाईल, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीप्रमाणे, या निवडणुकीतही आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेण्याच्या हालचाली पक्षाने सुरू केल्या आहेत. पक्षातील काही नगरसेवक अन्य पक्षांत जाण्याच्या तयारीत असल्यामुळे पक्षनेतृत्वाने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे, त्यामुळे निष्क्रियांना पुन्हा रिंगणात उतरविले जाण्याची शक्‍यता नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: NCP to deny tickets to inefficient corporators in Pune