राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

शास्ती करमाफीवरून विरोधक एकवटले; महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न, भाजप-राष्ट्रवादीमध्ये घोषणायुद्ध

शास्ती करमाफीवरून विरोधक एकवटले; महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न, भाजप-राष्ट्रवादीमध्ये घोषणायुद्ध

पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामधारकांना शास्तीकरात शंभर टक्के माफी द्यावी, या मागणीसाठी गुरुवारी महापालिका सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे असे सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन अभूतपूर्व गोंधळ घातला. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यासह चार नगरसेवकांवर महापौर नितीन काळजे यांनी तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबनाची कारवाई केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी विरोधकांनी सभा संपल्यानंतर महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ घोषणायुद्ध रंगले.  

विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक दत्ता साने, मयूर कलाटे अशा निलंबित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नावे आहेत. शून्य ते ६०० चौरस फुटांपर्यंत शास्तीकरात माफी देण्याची सवलत सध्या राज्य सरकारने दिली आहे. तर, ६०१ ते एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ५० टक्के दराने शास्ती आकारण्याचे निर्देश आहेत. त्याउलट १००१ चौरस फुटांपुढील घरांसाठी पूर्वीप्रमाणेच दुपटीइतका शास्तीकर लागू राहणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका सभागृहात अवलोकनासाठी होता. त्या विषयी चर्चा सुरू झाल्यानंतर ६०१ चौरस फूट ते १००० चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही शास्तीकरात माफी द्यावी, अशी उपसूचना उषा ढोरे यांनी मांडली. या उपसूचनेसह हा प्रस्ताव संमत झाला. 

शहरातील अनधिकृत बांधकामधारकांबाबत कोणताही दुजाभाव न ठेवता शास्ती कर संपूर्ण माफ करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने घेतली. तशी उपसूचनादेखील वैशाली घोडेकर यांनी मांडली. मात्र, ती अमान्य केली. संपूर्ण शास्तीकर माफीची मागणी सत्ताधारी भाजपने नाकारल्याने विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली.

विरोधी पक्षनेते योगेश बहल, मंगला कदम, दत्ता साने, वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर आदींसह राष्ट्रवादीचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमले. त्यांनी याबाबत मतदान घेण्याची मागणी केली. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक नीलेश बारणे, ॲड. सचिन भोसले, प्रमोद कुटे तर, मनसेचे गटनेते सचिन चिखले हे महापौरांच्या आसनासमोर जमले.

दरम्यान, साने यांनी सभागृहातील कुंड्या उचलून महापौरांच्या आसनावर ठेवण्यास सुरवात केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. महापौरांनी सर्वांना खाली बसण्याच्या सूचना केल्या. दत्ता साने यांचे तीन सभांसाठी निलंबन करा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली.

त्यानंतर महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. पुन्हा सभा सुरू झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ कायम असल्याने सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यानुसार, महापौर काळजे यांनी बहल, कदम, साने, कलाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न
सभागृहातून महापौर नितीन काळजे बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन मागे घ्यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणायुद्ध रंगले. महापौर कक्षात गेल्यानंतरही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांची तेथे भेट घेऊन याबाबत विचारणा केली.

निलंबन मागे घेणार नाही

गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना निलंबित केले आहे. त्यांचे निलंबन कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, दत्ता साने आणि मयूर कलाटे या चार नगरसेवकांनी शास्तीकराच्या संपूर्ण माफीसाठी सभागृहात गोंधळ घातल्याने त्यांना तीन सभांकरिता निलंबित केले आहे. त्यांचे निलंबन मागे घेणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौर रिमोट कंट्रोलवर काम करतात, असा आरोप बहल यांनी केला. याबाबत बोलताना महापौर म्हणाले, ‘‘माझ्यावर कोणाचाही रिमोट नाही. कोणाच्या सांगण्यावरून मी त्यांना निलंबित केलेले नाही. सभागृहातील त्यांचे वर्तन अशोभनीय आहे. आपल्यापेक्षा ज्युनिअर नगरसेवक महापौर झाल्याचे दुःख त्यांना आहे. अनधिकृत घरे नियमित करण्याचा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडून मंजूर होणार आहे. यामुळे संपूर्ण शास्तीकर माफीची विरोधकांची मागणी निरर्थक आहे. विषय मंजूर झाल्यावर विरोधकांची मतदानाची मागणी सभाशास्त्राच्या नियमाला धरून नव्हती.’’

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘गेल्या १५ वर्षांत राष्ट्रवादीला अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा प्रश्‍न सोडविता आला नाही. आम्ही शास्तीकराचा प्रश्‍न अडीच वर्षांत सोडविला. लवकरच अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍नही सुटेल. एकदा घरे अधिकृत झाली की शास्तीकराचा प्रश्‍नच राहणार नाही. राष्ट्रवादी अद्यापही पराभवाच्या गर्तेतून बाहेर आलेली नाही. मनसेच्या गटनेत्याला तर आपण कशासाठी सभात्याग केला हेदेखील माहिती नव्हते. याबाबत ते अज्ञानीच होते. पक्षाच्या बैठकीत स्मार्टसिटीचा विषय मंजूर करण्याचे ठरले होते. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याचे लक्षात आल्याने तो विषय तहकूब केला.’’

गाडी, दिव्याबाबत योग्य वेळी निर्णय - महापौर
सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी गाडीचा त्याग केला, तसेच पुण्याच्या महापौरांनी आपल्या वाहनावरील दिवा काढून टाकला. याबाबत पत्रकारांनी विचारले असता महापौर म्हणाले, ‘‘गाडीवरचा दिवा कधी काढायचा आणि वाहनाचा त्याग कधी करायचा याबाबत आपण योग्य वेळी निर्णय घेऊ. महापौरांना दिवसातून दहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमासाठी जावे लागते. यामुळे त्यांना वाहन आवश्‍यकच आहे.

मोटारीवरील दिवा काढून टाकण्याचा नियम नाही. मात्र, योग्यवेळी आपण याबाबत निर्णय घेऊ.’’

Web Title: ncp four corporator suspend in municipal