राज्याचे मुख्यमंत्री 'फसवणीस': धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मोदींनी पुण्याला काय दिले? 
""पुणेकरांनी भाजपला एवढी मतं देऊन मोदींनी पुणेकरांसाठी काय केलं? केंद्र आणि राज्य सरकारांच्या धोरणांमुळे राज्यातील उद्योजक अडचणीत आले आहेत. बांधकाम, शैक्षणिक आणि अन्य क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे, नीरव मोदींची कारस्थाने माहीत असतानाही त्याच्यावर योग्य वेळी कारवाई केली नाही. सत्तेच्या बळावर भाजप काहीही करीत नाही. पण, प्रत्येकाचे दिवस येतात. हे विसरू नका,'' असे अजित पवार म्हणाले. 

पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण मुख्यमंत्री मात्र सरसकट "क्‍लीन चिट' देत आहेत, असे सांगत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. देवेंद्र "फसवणीस' असा उल्लेख करून मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलन बुधवारी पुण्यात आले. त्या निमित्ताने वारजे येथे आयोजित सभेत मुंडे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर घाणाघात केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नेते अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप-वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी या वेळी उपस्थित होते. 

मोदी सरकारच्या "अच्छे दिन' घोषणेची खिल्ली उडवीत मुंडे म्हणाले, ""गरिबांच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे स्वप्न दाखविले. मात्र, अद्याप 15 पैसेही मिळालेले नाहीत. उलटपक्षी सरकारच्या कारभारामुळे प्रत्येकावर 15 लाख रुपये कर्ज फेडण्याची वेळ येण्याची भीती आहे. दोन्ही सरकारांबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे.'' भाजपचा वर्धापनदिन सहाऐवजी एक एप्रिलला साजरा केला असता, तर त्याचे महत्त्व अधिक वाढले असते, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. 

सुळे म्हणाल्या, ""हे आंदोलन भाजपविरोधात नसून भाजप महाराष्ट्रावर करीत असलेल्या अन्यायाविरुद्ध आहे.'' 

मोदींनी पुण्याला काय दिले? 
""पुणेकरांनी भाजपला एवढी मतं देऊन मोदींनी पुणेकरांसाठी काय केलं? केंद्र आणि राज्य सरकारांच्या धोरणांमुळे राज्यातील उद्योजक अडचणीत आले आहेत. बांधकाम, शैक्षणिक आणि अन्य क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे, नीरव मोदींची कारस्थाने माहीत असतानाही त्याच्यावर योग्य वेळी कारवाई केली नाही. सत्तेच्या बळावर भाजप काहीही करीत नाही. पण, प्रत्येकाचे दिवस येतात. हे विसरू नका,'' असे अजित पवार म्हणाले. 

राष्ट्रवादीचा नाद करू नका 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही मुंडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ""पवार साहेबांवर टीका करता, फडणवीस तुमचे वय काय? पवार साहेबांवर टीका करण्याआधी तुम्ही मोदींशी तरी बोलायला हवे होते. कारण, मोदी म्हणतात, पवारांची करंगळी धरून राजकारण आलो. पवारांवर टीका कराल, तर याद राखा. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नाद करू नका.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP halla bol movement dhananjay munde