राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा बुधवारी कामशेतमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पंचवीस हजार कार्यकर्ते या हल्लाबोलमध्ये सहभागी होणार असून सोमाटणे फाटा येऊन भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी दिली. 

टाकवे बुद्रुक : डिझेल पेट्रोलचे दर का भिडेल गगनाला, चला विचारू ना कर्त्या सरकारला!  सरकार नाही भानावर राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर असा एल्गार करीत महागाई, बेरोजगारी, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला बाजारभाव, हमीभाव,कर्जमाफी, इंधनाचे वाढते भाव, नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या प्रश्नांचा भडिमार करण्यासाठी बुधवारी सकाळी १० वाजता मावळातील कामशेतच्या शिवाजी चौकात 'राष्ट्रवादी काँग्रेसने  हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले आहे.

पंचवीस हजार कार्यकर्ते या हल्लाबोलमध्ये सहभागी होणार असून सोमाटणे फाटा येऊन भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी दिली. 

विधी मंडळाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे ,विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, जयवंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, चित्रा वाघ,संग्राम कोते पाटील, मदन बाफना, कृष्णराव भेगडे, जालिंदर कामठे, रमेश थोरात, विश्वास देवकाते यांच्या सह राष्ट्रवादीचे प्रदेश व जिल्हा पातळीवरील नेते मार्गदर्शन करणार आहेत. 

सर्वच घटकांवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल अस्त्र उगारले आहे. मावळ तालुक्यात हल्लाबोलची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीने गाव, गट, विभाग, प्रभाग निहाय बैठका घेऊन युवक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार यांना या मेळाव्यात सहभागी करून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे. 

सोमाटणेतील टोल नाक्यापासून भव्य दुचाकी रॅली पुणे मुंबई महामार्गाने  तळेगाव, वडगाव मावळ, कान्हे फाटा मार्गे येथील शिवाजी चौकात पोहचणार आहे. शिवाजी चौकात भव्य मंडप उभारला असून पंधरा हजार खुर्च्या तर दहा हजार भारतीय बैठक व्यवस्था केली आहे. स्वतंत्र पणे पार्किंग व्यवस्था केली असून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची टीम राबत आहे.

Web Title: NCP Hallabol yatra in Kamshet