राष्ट्रवादीचा ऐतिहासिक विजय | Election Results 2019

ज्ञानेश्‍वर वाघमारे  
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

शेळके यांना एक लाख ६७ हजार ७१२ तर भेगडे यांना ७३ हजार ७७० मते मिळाली. या देदीप्यमान विजयामुळे शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने मावळात गेल्या पंचवीस वर्षांचा आमदारकीचा वनवास संपविण्यात यश मिळवले.

वडगाव मावळ -  मावळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा ९३ हजार ९४२ विक्रमी मतांनी दारुण पराभव केला. शेळके यांना एक लाख ६७ हजार ७१२ तर भेगडे यांना ७३ हजार ७७० मते मिळाली. या देदीप्यमान विजयामुळे शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने मावळात गेल्या पंचवीस वर्षांचा आमदारकीचा वनवास संपविण्यात यश मिळवले. भाजपच्या बनलेल्या बालेकिल्ल्याला धक्का देत प्रदीर्घ काळानंतर मिळालेल्या या विजयाचा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी फटाक्‍यांची आतषबाजी व भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. भेगडे यांचा पराभव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे व आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्यातच प्रामुख्याने लढत होती. दोन्ही बाजूंनी ही लढत प्रतिष्ठेची करण्यात आल्याने चुरशीने मतदान झाले होते. दोन लाख ४७ हजार ९६१ मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला होता. दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. गुरुवारी तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये निवडणूक अधिकारी सुभाष भागडे व सहायक निवडणूक अधिकारी मधुसूदन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीची मतमोजणी पावणेनऊ वाजता पूर्ण झाली. 

पहिल्या फेरीपासून आघाडी
पहिल्याच फेरीत शेळके यांनी एक हजार ८६७ मतांची आघाडी घेतली व प्रत्येक फेरीमध्ये ती वाढतच गेली. मतमोजणीच्या २७ फेऱ्या झाल्या. प्रत्येक फेरीत शेळके यांची आघाडी सुमारे चार ते साडेचार हजार मतांनी वाढत गेली. दुसऱ्या फेरीत चार हजार ३३७ मतांची, तिसऱ्या फेरीत आठ हजार १२५ मतांची, चौथ्या फेरीत तेरा हजार ५४२, पाचव्या फेरीत १९ हजार २६८ मतांची, सहाव्या फेरीत २३ हजार १२३ मतांची, सातव्या फेरीत २७ हजार २१० मतांची, आठव्या फेरीत ३१ हजार ३६७ मतांची, नवव्या फेरीत ३५ हजार २३९ मतांची, दहाव्या फेरीत ३९ हजार ३३३ मतांची, अकराव्या फेरीत ४३ हजार १९४ मतांची आघाडी घेतली. तेराव्या फेरीनंतर ती पन्नास हजारांवर गेली व शेवटी ९३ हजार ९४२ एवढ्या विक्रमी मतांनी त्यांनी विजय प्राप्त केला. चुरशीची वाटणारी लढत एकतर्फी झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. 

शहरी, ग्रामीण भागात ‘घड्याळ’च
शेळके यांना आंदर, पवन, नाणे मावळ या ग्रामीण भागासह लोणावळा, देहूरोड, तळेगाव, वडगाव या शहरी भागातूनही सार्वत्रिक आघाडी मिळाल्याचे दिसून आले. शेळके सकाळपासूनच मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते. दुपारी बाराच्या सुमारास विजय निश्‍चित झाल्यानंतर ते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर निघून गेले. निकालाचा कल लक्षात घेऊन भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही विसाव्या फेरीनंतर मतमोजणी केंद्र सोडले.

शांततेत मतमोजणी
एका केंद्राच्या मशिनचा डिस्प्ले नादुरुस्त झाल्याने त्यातील व्हीव्हीपॅट चिठ्‌ठ्यांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे मतमोजणीला वेळ लागला. दुपारी चार वाजता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. निवडणुकीतील चुरस लक्षात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP historical victory