Pune Election: काँग्रेसच्या मर्मावर बोट ठेवत पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने केला दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Election

Pune Election: काँग्रेसच्या मर्मावर बोट ठेवत पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने केला दावा

भाजप आणि शिवसेनेला (शिंदे गट) हरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिघांनी वज्रमूठ बांधलेली असतानाही पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या जागेवर डोळा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणेच दावा ठोकून ती जागा मिळविण्याची व्यूहनीती आखल्याचे दिसत आहे.

‘राष्ट्रवादी’च्या खेळीकडे काँग्रेसने बारीक लक्ष ठेवून त्यांचा डाव उधळण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. परिणामी पुण्याच्या जागेवरून आघाडीतील दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आतापर्यंत पुणे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. या मतदारसंघात त्यांचे उमेदवार अनेकदा निवडूनही आले आहे. २०१४ पासून राष्ट्रवादी काँग्रेस विस्तार करू पाहत आहे. त्यातूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’च्या काही नेत्यांनी पुण्यातील जागेवर हक्क सांगितला होता. पक्षाचे नेते अजित पवार यांनी २०१९ च्या आधीच पुण्याच्या जागेबाबत सूचक विधान केले होते.

आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला की, पुण्यातील लोकसभेची पोटनिवडणुकीची जागा ही काँग्रेस लढवेल असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हंटलंय त्यावर अजित पवार म्हणाले कि, मग मी म्हणेन हि जागा राष्ट्रवादी लढवेल. तर पुढे ते म्हणाले कि, आम्ही दोघांनी सांगुन काही उपयोग आहे का? वरच्या स्तरावर चर्चा होईल. एक आहे काँग्रेस किती काही म्हणाली तरी पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असं अजित पवार बोलताना म्हणालेत.

पुण्याची सध्याची स्थिती पाहिली तर कुणाचे आमदार-खासदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. काँग्रेसकडे याआधीपासूनच ही पुण्यातील जागा होती. पण काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. एखाद्या मतदारसंघात जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथं जास्त असेल तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे. दुसरकडे जरी अशीच उलट परिस्थिती असेल. तेव्हाही असंच घडलं पाहिजे. जागांची अदलाबदलही करायला हवी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

भाजपचे नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीतील कोणता पक्ष उमेदवार देणार हे पाहणं महत्वाचं असेल. अजित पवार यांनी कालही या जागेवर दावा केला होता. तसंच काँग्रेसनेही पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.

भाजपला रोखण्यासाठी आता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची आघाडी उभी राहिली आहे. लोकसभेच्या२०२४ च्या निवडणुकीच्या जागावाटपाचा निमित्ताने झालेल्या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्याचे जाहीर झाले आहे. तरीही पुण्याच्या जागेवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा दावा केल्याने राजकीय वर्तुळात विशेषतः काँग्रेसच्या गोटात गोंधळ उडाला आहे.

ताकद वाढल्याचा काँग्रेसचा दावा

भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. त्याचवेळी भाजप आणि विरोधकांच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष पुण्याकडे लागले असताना या जगेवरून आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये नवा वाद उद्‍भवण्याचे चित्र आहे.

दुसरीकडे भाजपचे आव्हान असताना गेल्या अडीच तीन वर्षांत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा करत काँग्रेस नेत्यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असतानाही पंढरपूर विधानसभा निवडणुकीत या पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे सांगून एखादी जागा मिळवणे योग्य नाही, असे बोल काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ऐकवत आहेत.