राम कृष्ण हरी, पूल लवकर करा गडकरी... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पौड रस्ता - गजबजलेल्या चांदणी चौकात जय जय रामकृष्ण हरी, पूल लवकर करा गडकरी... असा घोष करत आंदोलनकर्ते दिलेल्या आश्वासनाचे सरकारला स्मरण करून देत होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या खडकवासला विधानसभा विभागाच्या वतीने रविवारी सकाळी उड्डाण पुलाच्या भूमिपूजनाचा स्मृती दिन हे अभिनव आंदोलन करून साजरा करण्यात आला. 

पौड रस्ता - गजबजलेल्या चांदणी चौकात जय जय रामकृष्ण हरी, पूल लवकर करा गडकरी... असा घोष करत आंदोलनकर्ते दिलेल्या आश्वासनाचे सरकारला स्मरण करून देत होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या खडकवासला विधानसभा विभागाच्या वतीने रविवारी सकाळी उड्डाण पुलाच्या भूमिपूजनाचा स्मृती दिन हे अभिनव आंदोलन करून साजरा करण्यात आला. 

माजी नगरसेवक शंकर केमसे, विजय डाकले, राजाभाऊ गोरडे, राजेंद्र उभे, साधना डाकले, कीर्ती पानसरे, शरद दबडे, अनिकेत वेडे पाटील, चंदू गायकवाड, पंकज खोपडे, दत्ताभाऊ काळभोर, संकेत वेडे पाटील, गणेश वेडे पाटील, नीलेश हुलावळे, योगेश वेडे पाटील, मयूर काळभोर, मिलिंद शिंदे, मयूर सकट, संदीप भरतवंशी, सदाशिव तापकीर, राहीन जसवंते, भागवत भोये, महेश वेडे पाटील यांचा आंदोलनात सहभाग होता. रस्त्यावर कसला धार्मिक विधी चालला आहे, हे लोक उत्सुकतेने पाहात होते. चांदणी चौकाच्या उड्डाण पुलाचे भूमिपूजन करून नऊ महिने पूर्ण झाले तरी या पुलाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. नागरिकांना उड्डाण पुलाचे आश्वासन देण्यात आले. त्याचे भूमिपूजन केले. टेंडर काढले. एवढे सर्व होऊिनही काम सुरू का नाही, आपली कार्यक्षमता सिद्ध करा, असे आव्हान देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने चांदणी चौक येथे उड्डाण पुलाच्या भूमिपूजनाचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. 

वसंत पाटील म्हणाले, ""माझ्या मेहुणीचा मुलगा रजत कुलकर्णी याचे चार वर्षांपूर्वी याच चांदणी चौकात अपघाती निधन झाले. जी वेळ आमच्यावर आली ती कोणावरही येऊ नये. त्यामुळे पुलाचे काम सुरू करा.'' 

शंकर केमसे म्हणाले, ""मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गेल्या चार वर्षांत अनेक वेळा चांदणी चौकाच्या पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल असे विधान केले; परंतु अजूनही येथील काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे फेकू सरकारचा आम्ही निषेध करतो.'' 

स्मृती दिनाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस खडकवासला विधानसभा अध्यक्ष कुणाल वेडे पाटील यांनी केले. वसंत पाटील यांनी विधी प्रार्थना केली. 

मोदी सरकार फक्त आश्वासनेच देते; पण दिलेल्या आश्वासनांची त्यांना आठवण नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले. 
कुणाल वेडे पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, खडकवासला विधानसभा विभाग 

Web Title: NCP Khadakvasla Assembly Constituency Movement in Chandni Chowk