राष्ट्रवादीची नेहमीचीच "अपक्ष' खेळी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकापेक्षा अधिक इच्छुक असल्यास त्यावर तोडगा म्हणून अधिकृत उमेदवारी एकाला देऊन दुसऱ्याला निवडून आणायचे तंत्र पिंपरी चिंचवड शहरात कायम चालत आले. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत विलास लांडे, महेश लांडगे भोसरीतून लक्ष्मण जगताप चिंचवडमधून "अपक्ष' म्हणून विजयी झाले आणि नंतर पुन्हा पक्षात सामील झाल्याचा इतिहास आहे. आता विधान परिषदेलाही तोच "फॉर्म्युला' असण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

दरम्यान, आजवरच्या या खेळीमुळे आता खुद्द अजित पवार यांचीच मोठी कोंडी झाल्याचे बोलले जाते. 

पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकापेक्षा अधिक इच्छुक असल्यास त्यावर तोडगा म्हणून अधिकृत उमेदवारी एकाला देऊन दुसऱ्याला निवडून आणायचे तंत्र पिंपरी चिंचवड शहरात कायम चालत आले. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत विलास लांडे, महेश लांडगे भोसरीतून लक्ष्मण जगताप चिंचवडमधून "अपक्ष' म्हणून विजयी झाले आणि नंतर पुन्हा पक्षात सामील झाल्याचा इतिहास आहे. आता विधान परिषदेलाही तोच "फॉर्म्युला' असण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

दरम्यान, आजवरच्या या खेळीमुळे आता खुद्द अजित पवार यांचीच मोठी कोंडी झाल्याचे बोलले जाते. 

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीने अनिल भोसले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून बंडखोरी केली. या बंडखोरीलाही खुद्द अजित पवार यांचेच पाठबळ असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

दहा वर्षांपूर्वी विधान परिषदेसाठी याच मतदारसंघातून कॉंग्रेसचे चंदुकाका तथा चंद्रकांत जगताप आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. त्या वेळी आताचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीत होते. त्यांनी बंडखोरी केली आणि मोठ्या फरकाने ही जागा अपक्ष म्हणून जिंकली. नंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा आघाडीच्या वाटपात कॉंग्रेसकडे गेली होती. त्या वेळी कॉंग्रेसची अधिकृत उमेदवारी भाऊसाहेब भोईर यांना मिळाली होती. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून पुन्हा जगताप यांनीच रिंगणात उडी मारली आणि जिंकली. दोन्हीवेळेस खुद्द अजित पवार यांचीच खेळी ती होती, हे नंतर स्पष्ट झाले. कारण विजयी झालेले जगताप कायम राष्ट्रवादीच्या बरोबर होते. 

भोसरी विधानसभा मतदारसंघातूनही 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची अधिकृत उमेदवारी ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांना मिळाली होती. त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी होती म्हणून विलास लांडे यांनी बंड केले आणि मोठ्या फरकाने ते विजयी झाले. नंतर लांडे हे अजित पवार यांच्याच बरोबर कायम राहिले. 2014 च्या विधानसभेलाही तगड्या इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पुन्हा पेच निर्माण झाला होता. त्या वेळी लांडे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचे भाचेजावई नगरसेवक महेश लांडगे यांनी बंड केले आणि अपक्ष म्हणून बाजी मारली. लांडगे आमदार झाल्यावर "महेश आमचाच आहे', असे अजित पवार यांनी वारंवार जाहीर केल्याने त्यांच्याही बंडाला पाठबळ कुणाचे होते ते स्पष्ट झाले. 
पुणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून उमेदवारीसाठी विलास लांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, पक्षाचे शहर प्रवक्ते योगेश बहल आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर स्पर्धेत होते. सर्वांनाच उमेदवारीची अपेक्षा होती. चौघेही तगडे इच्छुक असल्याने एकाला उमेदवारी दिली, तरी दुसरा नाराज हे ठरलेले होते. त्यासाठी नाराजीचा सूर असूनही पुन्हा पुणे शहराला प्राधान्य देऊन आमदार अनिल भोसले यांना संधी देण्यात आली. दुसरीकडे लांडे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने अजित पवार यांची कोंडी झाली आहे. लांडे यांची उमेदवारी ही अत्यंत परिणामकारक असणार, याची जाणीव पवार यांना असल्याने त्यांच्या माघारीसाठी अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, "निवडणूक लढविण्यावर मी ठाम आहे, आता कदापी माघार नाही,' असे स्वतः लांडे यांनी "सकाळ'ला सांगितल्याने रंगत वाढली आहे. 

भोसले यांच्या विरोधात सर्व विरोधक (भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, मनसे आदी ) एकवटले असून, लांडे यांना पुरस्कृत करण्याचे डावपेच आहेत. त्यामुळेच जुनीच अपक्ष उमेदवारीची खेळी यशस्वी होते का याकडे सर्वांचे लक्ष राहिले आहे.

Web Title: NCP knock Conventional Independent