...यामुळे बारामतीतील मताधिक्याचा आकडा दबकत सांगत होतो : अजित पवार

सागर आव्हाड
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

पक्ष सोडून गेलेले अनेक लोक पडले आहेत. जे पडले त्यांनी आत्मपरिक्षण करावं. बारामतीमध्ये अपेक्षापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं आहे. पुढील काळात विरोधी पक्ष म्हणूण चांगलं काम करू.

बारामती : विधानसभा निवडणुकीत भाजपने बारामतीमध्ये सक्षम उमेदवार दिला होता. म्हणून मी निवडणुकीपूर्वी मताधिक्याचे आकडे दबकत-दबकत सांगत होते. मात्र, जनतेने मला आणखी मोठा आशीर्वाद दिला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच अजित पवार आज (सोमवार) पाडव्यानिमित्त माध्यमांसमोर आले. बारामतीतील गोविंदबाग येथे दरवर्षी पवार कुटुंबिय कार्यकर्त्यांची भेट घेतात. आज अजित पवार व कुटुंबातील लोक कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आले होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, की पक्ष सोडून गेलेले अनेक लोक पडले आहेत. जे पडले त्यांनी आत्मपरिक्षण करावं. बारामतीमध्ये अपेक्षापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं आहे. पुढील काळात विरोधी पक्ष म्हणूण चांगलं काम करू. जनतेने हे दाखवून दिलं, की लोकसभेचे निकाल व राज्याचे निकाल वेगळे लागतात.

86 वर्षांचे आजोबा बुलडाण्याहून गोविंदबागेत
बारामतीत गोविंदबागेत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. बुलडाणा येथून 86 वर्षांचे आजोबा आले आहेत. सिंदखेडराजाचे नगर परिषदचे पाहिले नगर अध्यक्ष ते पवार यांच्यामुळे झाले होते. ज्या प्रमाणे वारकरी विठ्ठल दर्शनाला पंढरपूरला जातात. त्याप्रमाणे कार्यकर्ते बारामतीमध्ये येतात. आमच्यासाठी शरद पवार विठ्ठल आहेत. या वयात त्यांच्याकडे पाहून आम्हाला प्रेरणा, ऊर्जा मिळते. गोविंदबागेतून नवीन प्रेरणा आम्हाला मिळते असे जेष्ठ कार्यकर्ते सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar talked about victory margin in Baramati