पवार-सोनिया गांधी भेटीनंतरच सरकार स्थापनेचा निर्णय; राष्ट्रवादीचा पुनरुच्चार

टीम ई-सकाळ
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज पुण्यात बैठक झाली.

पुणे : राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची पुण्यात बैठक झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गट नेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या वेळी दिली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

एअरइंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार

बैठकीनंतर नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज येथे एक बैठक झाली. बैठकीला सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बैठकीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. त्यात. राज्यात लवकरात लवकर पर्यायी सरकार निर्माण व्हायला हवी, या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो. उद्या सोमवारी दिल्लीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंगळवारी पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होईल. त्यानंतरच काय तो निर्णय घेतला जाईल. आम्ही विधानसभा निवडणूक काँग्रेस सोबत आघाडी करून लढलो आहे. त्यामुळे काँग्रेसशी चर्चा करूनच जो काय तो निर्णय घेऊ.'

राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल यांची दांडी

ठरलं तेवढचं बोलले 
मीडियाशी बोलताना नवाब मलिक यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही. बैठकीत झालेल्या चर्चेची संक्षिप्त माहिती आणि उद्या होणारी पवार-सोनिया गांधी बैठक आणि मंगळवारी होणारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची नियोजित बैठक एवढीच संक्षिप्त माहिती मलिक यांनी दिली. गेल्या दोन आठवड्यातील राजकीय घडामोडी आणि बैठका पाहता. नेत्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना कोणतेही उत्तर देणे टाळले आहे. नेते मीडियाशी बोलताना काय बोलायचे ते आधीच ठरवून येत आहेत आणि जे ठरलंय तेवढच बोलून निघून जात असल्याचे दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader nawab malik statement after core committee meeting