विरोधी पक्षनेतेपदाची "राष्ट्रवादी'ला प्रतीक्षाच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - महापालिकेचा दैनंदिन कारभार सुरू झाला, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांना विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र अद्याप मिळालेले नाही. स्वतंत्र दालनासाठीदेखील प्रतीक्षाच करावी लागत आहे. 

पुणे - महापालिकेचा दैनंदिन कारभार सुरू झाला, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांना विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र अद्याप मिळालेले नाही. स्वतंत्र दालनासाठीदेखील प्रतीक्षाच करावी लागत आहे. 

महापालिकेच्या सभागृहात भाजपनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक म्हणजे 41 सदस्य आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणार, हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीने महापालिकेतील गटनेतेपदी चेतन तुपे यांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र मिळणे अपेक्षित आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी भाजपचे गटनेते श्रीनाथ भिमाले यांना सभागृहनेतेपदाचे पत्र गुरुवारी दिले. मात्र, तुपे यांना विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र आणि स्वतंत्र दालन अद्याप मिळालेलेच नाही. 

याबाबत तुपे यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळावे, असे पत्र दिल्यावर त्यांना पत्र देण्यात येईल, असे भाजपने स्पष्ट केले. त्यामुळे तुपे यांनी गुरुवारी सकाळी त्याबाबतचे पत्र महापौर कार्यालयात दिले. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांना पत्र मिळालेले नव्हते. ""राष्ट्रवादी कॉंग्रेसने कायद्यातील तरतुदींनुसार याबाबतची मागणी केली आहे, त्यामुळे आता कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी भाजपवर आहे,'' अशी प्रतिक्रिया तुपे यांनी व्यक्त केली. 

Web Title: NCP Leader of Opposition pmc